पदकाबरोबरच ऑलिम्पिक प्रवेशिका मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या पूजा राणीने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील ७५ किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने चुरशीच्या लढतीत युक्रेनच्या मारिया बोरुत्साचा पराभव केला.
पूजा व मारिया यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार ठोशांचा उपयोग केला. दोन्ही खेळाडूंनी विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र पूजा हिने सुरेख खेळ करीत विजयश्री खेचून आणली. बिगर ऑलिम्पिक विभागात निखात झरीन (५४ किलो) व सोनिया लथार (५७ किलो) यांनीही उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. झरीनने ऑस्ट्रेलियाच्या बियान्का अलमीरवर सनसनाटी विजय मिळवला. माजी कनिष्ठ विश्वविजेत्या या खेळाडूने २-१ अशी ही लढत जिंकली. तिला आता कॅनडाच्या एरिका अदीजेईशी खेळावे लागणार आहे. सोनियाने मंगोलियाच्या गुंदेग्मा मियाग्मारवर ३-० अशी मात केली. तिला आता जर्मनीच्या नोमिन देउशशी झुंज द्यावी लागणार आहे. मीना राणीला (६९ किलो) मात्र जर्मनीच्या नादिन अ‍ॅपतेझने एकतर्फी लढतीत पराभूत केले.