गतविजेत्या पूजा राणीने (७५ किलो) आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पूजाने अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या मावल्दा मोवलोनोव्हाचा ५-० असा पराभव केला. स्पर्धेतील हा तिचा पहिला सामना होता. उपांत्य फेरीत तिला वॉकओव्हर मिळाला होता.

तर, सहा वेळा विश्वविजेती भारताची स्टार महिला बॉक्सिंगपटू एम.सी. मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. मेरीला कझाकस्तानच्या नाझीम कयजाबेविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेतील मेरीचे हे सातवे पदक आहे. २००३मध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – ‘फ्लाइंग सिख’ रुग्णालयातून घरी, पत्नीला ICUत हलवले

 

आपल्यापेक्षा ११ वर्षांनी कमी वयाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ३८ वर्षीय मेरीने प्रभावी सुरुवात केली. दुसर्‍या फेरीत दोन्ही बॉक्सर्सनी आक्रमक वृत्ती दर्शवली. कयजाबेने चांगली कामगिरी बजावत आपल्या खिशात गुण टाकले.

मेरीने शेवटच्या तीन मिनिटात पुनरागमनाचा प्रयत्न केला खरा, पण अपूर्ण ठरला. मणिपूरच्या मेरीला पाच हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले, तर कयजाबेला दहा हजार डॉलर्सची विजयी रक्कम मिळाली. कझाकिस्तानची कायजाबे दोन वेळा विश्वविजेते आणि सहा वेळा राष्ट्रीय चॅम्पियन आहे.