पुणे : आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर हिने इंदूर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत विजेतेपद पटकाविले. या मोसमातील तिचे हे पहिले विजेतेपद आहे.

पूजा हिने अंतिम फेरीत अर्चना कामथ हिच्यावर ८-११, ११-८, ११-८, १२-१०, ११-८ असा रोमहर्षक विजय नोंदविला. तिने टॉपस्पीन फटक्यांचा बहारदार खेळ करीत हे यश मिळविले. तिने उपांत्य फेरीत दिया चितळेला हरवले होते. पूजा ही आता कोरियन व ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे.

यंदा झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतास सांघिक विभागात ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लीग स्पर्धेतही तिने भाग घेतला होता.