लॅटव्हियावर ४-१ अशी मात; युरोपातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानी

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या  दोन गोलच्या जोरावर पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पध्रेत ‘ब’ गटात लॅटव्हियावर ४-१ अशा दणदणीत विजयाची नोंद केली. रिअल माद्रिदच्या या प्रमुख खेळाडूने २८व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर गोल करताना पोर्तुगालला आघाडीवर आणले. लॅटव्हियाच्या जिंट्स फ्रेइमनीजने पेनल्टी क्षेत्रात पोर्तुगालच्या नॅनीला चुकीच्या पद्धतीने पाडले आणि रोनाल्डोसोबतही हुज्जत घातली. त्यामुळे पोर्तुगालला पेनल्टी स्पॉट किक बहाल करण्यात आली.

तासाभराच्या खेळानंतर रोनाल्डोला ही आघाडी दुप्पट करण्याची संधी होती, परंतु यावेळी स्पॉट किकवर त्याला गोल करण्यात अपयश आले. मात्र, ६८व्या मिनिटाला लॅटव्हियाच्या अर्तुर्स झीजुझीनने अप्रतिम गोल करून सामना १-१ अशा बरोबरीत आणला. पुढच्याच मिनिटाला विलियम काव्‍‌र्हाल्होने यजमानांच्या आनंदावर पाणी फेरले. काव्‍‌र्हाल्होने गोलजाळीच्या जवळून हेडरद्वारे पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ८५व्या मिनिटाला रोनाल्डोने व्हॉलीद्वारे गोल करत पोर्तुगालच्या आघाडीत भर टाकली. उर्वरित सामन्यात रोनाल्डो दोन वेळा हॅट्ट्रिक साजरी करण्यासमीप आला, परंतु त्याला यश मिळाले नाही. भरपाई वेळेत ब्रुनो अ‍ॅल्व्हेसने गोल करून पोर्तुगालच्या विजयावर ४-१ असे शिक्कामोर्तब केले.

अव्व्ल स्थानावर असलेला स्वित्र्झलड आणि पोर्तुगाल (९) यांच्यात तीन गुणांचे अंतर आहे. स्वित्र्झलडने २-० अशा फरकाने फॅरो आइसलँडचा पराभव करून विजयी घोडदौड कायम राखली आहे. इरेन डेर्डीयोक आणि स्टीफन लिचस्टेइनर यांनी प्रत्येकी एक गोल केला. ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानावर असलेल्या हंगेरीने ४-० अशा फरकाने अँडोरावर मात केली. झोल्टन गेरा, अ‍ॅडम लँग, अ‍ॅडम ग्युस्करे आणि अ‍ॅडम सॅझलाई यांनी प्रत्येकी एक गोल केला.

  • ६८: सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या युरोपीय खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोने चौथे स्थान पटकावले आहे. त्याने १३६ सामन्यांत ६८ गोल करण्याचा पराक्रम केला. या कामगिरीसह त्याने पश्चिम जर्मनीच्या गेर्ड म्युलर यांच्या (६२ सामने व ६८ गोल) विक्रमाशी बरोबरी केली.
  • ८४ : सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये हंगेरी आणि स्पेनकडून खेळणाऱ्या फेरेंस पुस्कास (८९ सामन्यांत ८४ गोल) हे आघाडीवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ हंगेरीचे सँडोर कोक्सीस ( ७५ गोल) आणि जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोस ( ७१ गोल) यांचा क्रमांक येतो.