माझ्याविरोधात कटकारस्थान रचताना मला भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला यश मिळाले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने हे प्रकार रोखायला हवेत, असा आरोप भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यू. व्ही. रामन यांनी केला आहे.

रामन यांना महिला प्रशिक्षकपदावरून डच्चू देत मदनलाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) रमेश पोवार याची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. गांगुलीसह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविड यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये रामन यांनी अनेक आरोप केले आहेत.

‘‘एका वेगळ्याच गटाने माझ्याविरोधात कटकारस्थान रचले. ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकार थांबवायला हवेत. तुम्हाला किंवा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडून स्पष्टीकरणाची गरज असल्यास, त्यासाठी मी तयार आहे. मी आवाज उठवणाऱ्यांपैकी असल्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षांच्या काही गोष्टी लक्षात आणू इच्छित आहे. माझ्यात क्षमता नसल्याचे कारण देत मला प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आले, याविषयी मला कोणताही वाद घालायचा नाही. अन्य कोणत्या कारणावरून माझी हकालपट्टी केलेली मला आवडली असती. माझ्या २० वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत मी स्वत:ऐवजी संघहितालाच प्राधान्य दिले आहे,’’ असेही रामन यांनी सांगितले.

माजी महिला प्रशिक्षक रामन यांचा आरोप

क्षमता नसल्याच्या कारणावरून माझी उमेदवारी रद्द करण्यात आली, हे सर्वात जास्त निराशाजनक आहे. माझी कामकाजाची पद्धत आणि कार्यनैतिकता याबाबतीत वेगळे विचार मांडायला सांगितले जातील, असा अंदाज मी बांधला होता. माझी मते ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्याची माझी इच्छा होती, पण आता त्याचा कोणता परिणाम होईल, असे वाटत नाही.

डब्ल्यू. व्ही. रामन, भारताचे माजी क्रिकेटपटू

इंग्लंड दौऱ्यासाठी राजेश्वरीला डच्चू

नवी दिल्ली : डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे तिला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी डच्चू देण्यात आला आहे. सध्या ती करोनाच्या धक्क्यातूनही सावरत आहे. भारतीय महिला संघ पुरुष संघासह २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे.

’ कसोटी आणि एकदिवसीय : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, प्रिया पूनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेहा राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

’ ट्वेन्टी-२० संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देवल, स्नेहा राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय,  शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.