पुरुष हॉकी संघातील संभाव्य ३३ खेळाडूंची निवड

दुखापतीमधून तंदुरुस्त झालेला गोलरक्षक पी.आर.श्रीजेशसह ३३ खेळाडूंना यंदाच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी भारताच्या पुरुष संघात स्थान देण्यात आले आहे. हॉकी इंडियाने ही निवड जाहीर केली असून या खेळाडूंचे पहिले सराव शिबीर गुरुवारपासून येथे सुरू होत आहे.

श्रीजेशला गतवर्षीच्या सुरुवातीस अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या वेळी दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. त्यामुळे तो आठ महिने स्पर्धात्मक हॉकीपासून दूर होता. भुवनेश्वर येथे झालेल्या जागतिक हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यात भारताने कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. २०१६मध्ये कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील गोलरक्षक कृष्णन पाठकला वरिष्ठ संघासाठी निवडण्यात आले आहे. १८ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा बचावरक्षक नीलम संजीव झेसला वरिष्ठ संघात बढती मिळाली आहे. यंदा राष्ट्रकुल क्रीडा (एप्रिल), चॅम्पियन्स चषक (जुलै), आशियाई क्रीडा (ऑगस्ट), आशियाई चॅम्पियन्स (ऑक्टोबर), विश्वचषक (नोव्हेंबर) या महत्त्वपूर्ण स्पर्धाचा समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये चार देशांची स्पर्धा होणार असून त्यामध्ये भारताला न्यूझीलंड, बेल्जियम, जपान यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.

‘‘भारतीय संघाचे पहिले शिबीर फक्त १० दिवस चालणार असले तरीही त्याचा फायदा खेळाडूंना विश्रांतीनंतर एकत्रित सराव करण्यासाठी होणार आहे. न्यूझीलंडमध्ये साखळी गटात आठ सामने खेळावे लागणार आहेत. मी खेळाडूंना स्वत:च्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याबाबत सुचविले असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे त्यांना मार्गदर्शन केले जाईल. जागतिक लीगमधील कामगिरीच्या आधारे मीदेखील प्रत्येक खेळाडूबाबत काही टिप्पणी केली आहे. या लीगमध्ये खेळाडूंना जगातील सर्वोत्तम संघांबरोबर सामने करण्याची संधी मिळाली आहे,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरीन यांनी सांगितले.

संभाव्य खेळाडू

  • गोलरक्षक : आकाश चिकटे, सूरज करकेरा, पी.आर.श्रीजेश, कृष्णन पाठक.
  • बचावरक्षक : हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, दीपसेन तिर्की, वरुणकुमार, रुपिंदरपाल सिंग, बीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, गुरिंदर कुमार, नीलम संजीव झेस, सरदार सिंग.
  • मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, चिंगलेनासाना सिंग, एस.के.उथप्पा, सुमीत, कोठाजित सिंग, सतबिर सिंग, नीलकांता शर्मा, सिमरनजित सिंग, हरजीत सिंग.
  • आघाडी फळी : एस.व्ही.सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गरुजटसिंग, रमणदीप सिंग, अरमान कुरेशी, अफान युसूफ, तलविंदर सिंग, सुमीत कुमार.