राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद मिळविले असले तरी सायना नेहवाल व पी.व्ही.सिंधू या एकमेकांच्या प्रतिस्पर्धीच मानत असतात. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या अकादमीत सराव करण्यास प्राधान्य दिले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा यंदा होत आहेत. यंदाच्या मोसमातील राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूपेक्षा सायनाची कामगिरी अधिक सरस झाली होती.

सिंधूचे वडील रामण्णा यांनी सांगितले,की अनेक स्पर्धामध्ये या दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध असतात. एकाच ठिकाणी सराव केला तर एकमेकींचे गुणदोष, शारीरिक तंदुरुस्ती, शैली आदीबाबतही त्यांना माहिती होण्याची शक्यता आहे. सरावाचे ठिकाणीही एकमेकींशी स्पर्धा टाळण्यासाठीच या दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या अकादमीत सराव करण्यास प्राधान्य दिले आहे. गोपीचंद हे सकाळी दीड तास सिंधूला मार्गदर्शन करतात. त्याखेरीज इंडोनेशियाचे दोन प्रशिक्षकही तेथे मार्गदर्शन करीत असतात. सिंधू व सायना यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सराव करणे यात मला काही गैर वाटत नाही.

गोपीचंद यांच्याच दोन अकादमींमध्ये अध्र्या किलोमीटरचे अंतर आहे. बरेचसे खेळाडू नवीन अकादमीत प्रशिक्षण घेतात.

सिंधू हिला गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी, तसेच यंदाच्या इंडोनेशियन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अंतिम फेरीत सायनाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूपेक्षा सायना ही जास्त तंदुरुस्त खेळाडू असल्याचे दिसून आले होते.