भारतीय क्रिकेट संघाच्या सराव शिबिराला सुरुवात झाल्यानंतर चार ते सहा आठवडय़ांमध्ये सामन्यासाठीची तंदुरुस्ती राखण्यासाठी अव्वल खेळाडूंकरिता चार टप्प्यांत सरावाचे स्वरूप आखण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी दिली.

श्रीधर यांनी २०१४पासून भारतीय संघाच्या संघबांधणीत मोलाची भूमिका बजावली आहे. करोनानंतर क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा तसेच जसप्रीत बुमरा आणि अन्य खेळाडूंना तंदुरुस्ती कशी कायम राखता येईल, याविषयी श्रीधर यांनी पुढील कार्यपद्धतीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘चार ते सहा आठवडय़ांच्या कालावधीत आम्ही खेळाडूंना सामन्यासाठी सज्ज करू. वेगवान गोलंदाजांना पूर्वीसारखी तंदुरुस्ती राखण्याकरिता सहा आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. फलंदाजांना त्यापेक्षा कमी वेळ लागेल.’’ ते म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आम्हाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सराव शिबिराची तारीख कळवण्यात येईल, त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने सरावाला सुरुवात करू. १४ ते १५ आठवडय़ांच्या कालावधीनंतर सरावाला सुरुवात करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. मात्र त्यांच्यासाठी आम्ही योग्य पद्धतीने सरावाची आखणी केली आहे. आम्ही फार पुढचा विचार करणार नाहीत.’’

प्रदीर्घ कालावधीनंतर सरावाला सुरुवात केल्यानंतर खेळाडूंवर पडणारा अतिरिक्त ताण तसेच उद्भवणाऱ्या दुखापती याबाबतही श्रीधर यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘सुरुवातीलाच खेळाडूंवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. सुरुवातीला त्यांच्याकडून आम्ही हलका सराव करून घेणार आहोत.’’

‘‘पहिल्या टप्प्यात आम्ही वेगवान गोलंदाजांना थोडय़ा अंतरावरून धावत येत फक्त दोन षटके गोलंदाजी करण्यास सांगणार आहोत. २० ते ३० टक्के आत्मीयतेने गोलंदाजी करण्याचा सल्ला आम्ही त्यांना देऊ. क्षेत्ररक्षण करताना १० मीटर अंतरावरून सहा वेळा तर २० मीटर अंतरावरून सहा वेळा चेंडू फेकायला सांगणार आहोत. पाच ते सहा मिनिटे कोणताही ताण न घेता फलंदाजी करण्यास सांगणार आहोत. त्यानंतर थोडय़ा फार प्रमाणात सरावात वाढ केली जाईल. सरावाच्या चौथ्या टप्प्यात  सामन्यासारखा सराव खेळाडूंकडून घेणार आहोत,’’ असेही श्रीधर यांनी नमूद केले.

क्रिकेटमध्ये प्रथमच खेळाडूंच्या डोळ्यांची चाचणी

करोनानंतर सरावाला सुरुवात झाल्यानंतर खेळाडूंच्या डोळ्यांची चाचणी करण्याचा निर्णय बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. क्रिकेटमध्ये अशी चाचणी करणारा बंगाल हा पहिला संघ ठरणार आहे. बंगालच्या मुख्य आणि २३ वर्षांखालील संघातील खेळाडूंची चाचणी करण्यात येणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर खेळाडू सरावाला उतरतील, त्यावेळी खेळाडूंची दृष्टी योग्य आहे की नाही, हे पाहण्याचे असोसिएशन प्रशासन तसेच बंगालच्या प्रशिक्षकांनी ठरवले आहे. ‘‘क्रिकेटमध्ये दृष्टीला फार महत्त्व आहे. मुख्य प्रशिक्षक अरुण लाल यांनी डोळ्यांची चाचणी करण्याचे सुचवले होते. त्यानुसारच ही चाचणी केली जाणार आहे. एखाद्याच्या दृष्टीमध्ये दोष असेल तर तो दुरुस्त करण्याची संधी यानिमित्ताने मिळेल,’’ असे बंगाल असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले.