राज्यातील अव्वल बॅडमिंटनपटूंमध्ये तिचे नाव घेतले जाते. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपला खेळ आणखी घोटीव केला. दुहेरीत तिने राष्ट्रीय जेतेपदही नावावर केले. ज्वाला-अश्विनी जोडीनंतर दुहेरीत भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल करू शकेल असा विश्वास तिच्याबद्दल व्यक्त केला जात होता. मात्र एका घटनेने हे सगळे सकारात्मक चित्र विस्कटून गेले.
राष्ट्रीय शिबिरासाठी निवड न झाल्यानंतर मुंबईकर प्राजक्ता सावंतने गोपीचंद यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. गोपीचंद यांच्याविरुद्ध मानसिक छळवणुकीचा तसेच संघनिवडीदरम्यान अन्यायाचा आरोप केला. न्यायालयाने प्राजक्ताच्या बाजूने निकाल दिला. तिला राष्ट्रीय शिबिरात सामील करून घेण्याचा आदेश दिला. गोपीचंद यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी निश्चितच चांगली आहे. मात्र राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असणारी व्यक्ती खाजगी अकादमी कशी काय चालवू शकते असा सवालही न्यायालयाने केला. तांत्रिकदृष्टय़ा प्राजक्ताचा विजय झाला, परंतु गोपीचंद विरोधामुळे अन्य खेळाडूंनी तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे पसंत केले आहे.
‘माझ्याबरोबर कोणी बोलत नाही, दुहेरीत मला कोणी साथीदारही मिळत नाही’, असे हताशपणे प्राजक्ता सांगते. मी एकटी पडली आहे. माझे आयुष्यच पूर्णत: बदलून गेले आहे. प्रत्येकजण मला घाबरतो. माझी नियमित साथीदार माझ्याबरोबर खेळत नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचे हा प्रश्न माझ्यापुढे आहे असे ती पुढे सांगते.
ज्वाला गट्टाने विश्रांती घेतल्यामुळे अश्विनी पोनप्पाने प्रज्ञा गद्रेच्या साथीने खेळायला सुरुवात केली. प्राजक्ता प्रज्ञाच्या साथीने खेळत असे. प्रज्ञा अश्विनीसोबत खेळत असल्याने प्राजक्ताला साथीदार उरला नाही. न्यायालयीन प्रकरणानंतर तर प्राजक्तासह खेळण्यास कोणी तयार नाही. प्रशिक्षक गोपीचंद यांच्याशी मतभेद असल्याने प्राजक्ता सध्या मुंबईतच लेरॉय डिसा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन स्पर्धेत प्राजक्ता डिसा यांचा मुलगा निगेलसह मिश्र दुहेरीत तर महिला दुहेरीत तृप्ती मुरगुंडेच्या साथीने खेळली होती.
तृप्तीच्या साथीने येत्या काही दिवसांत राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा खेळण्यासाठी प्राजक्ता प्रयत्नशील आहे. मात्र नियमित साथीदार मिळवणे प्राजक्तासाठी अडचण ठरणार आहे. देशातील सर्वोत्तम दुहेरीचे खेळाडू गोपीचंद अकादमीचे आहेत. मात्र गोपीचंद यांच्या विरोधात गेल्याने हे खेळाडू तिच्याबरोबर खेळण्यास तयार होणार नाहीत.