22 April 2019

News Flash

ATP Rankings : प्रज्ञेशची अव्वल १००मध्ये झेप

प्रज्ञेश हा सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्रीनंतरचा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.

प्रज्ञेश गुणेश्वरन

एटीपी टेनिस क्रमवारी

नवी दिल्ली : गेल्या काही स्पर्धामध्ये सातत्याने कामगिरी करणाऱ्या प्रज्ञेश गुणेश्वरनला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. प्रज्ञेशने नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी टेनिस क्रमवारीत कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल १०० जणांमध्ये मुसंडी मारली आहे. त्याने ९७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

जगातील अव्वल १०० टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवणारा प्रज्ञेश हा सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्रीनंतरचा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. २०१८च्या मोसमात दमदार कामगिरी करत प्रज्ञेशने गेल्या आठवडय़ात एटीपी चेन्नई चॅलेंजर स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. प्रज्ञेशने अव्वल १०० जणांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवल्यास, त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या मुख्य फेरीत थेट खेळण्याची संधी मिळेल.

काही महिन्यांपूर्वी युकी अव्वल १०० जणांमध्ये होता. पण दुखापतीमुळे त्याला बराच काळ विश्रांती घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्याची १५६व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारताच्या रामकुमार रामनाथनने पाच क्रमांकाच्या सुधारणेसह १२८वे स्थान पटकावले आहे. साकेत मायनेनी २५५व्या तर शशीकुमार मुकुंद २७१व्या क्रमांकावर आहे.

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा ३७व्या क्रमांकावर कायम असून दिविज शरण ३९व्या तर लिएंडर पेस ७५व्या स्थानी आहे. जीवन नेदुनचेझियान ७७व्या तर पुरव राजा १००व्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये अंकिता रैनाने तीन क्रमांकांनी झेप घेत एकेरीत १६५वे स्थान प्राप्त केले आहे. कामराम कौर थंडी २११व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

First Published on February 12, 2019 2:16 am

Web Title: prajnesh gunneswaran breaks into top 100 in tennis rankings