राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज प्रकाश नाजंप्पा, अमनप्रित सिंह आणि जितू राय ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात लक्षवेधी कामगिरी केली. नेमबाज प्रकाशने २२२.४ अंकाची कमाई करत सुवर्ण कामगिरी केली. तर अमनप्रित आणि जितू राय यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केली. दुसरीकडे महिला गटात २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात अनू राज सिंगने कास्य पदक मिळवले.

या प्रकारात हिना सिद्धूसह भारताच्या तीन नेमबाज अंतिम फेरीत पात्र ठरल्या होत्या. यात अनू राजने पात्रता फेरीत ५७८ गुण मिळवले होते. राही सरनोबतनेदेखील तेवढेच गुण मि‍ळवले. हिना ५७१ गुण मिळवून पाचव्या स्थानी राहिली. गुरुवारी ऑलिम्पिक कास्यपदक विजेता गगन नारंगने रौप्य पदकाची कमाई केली होती. तर स्वप्निल कुसाळेने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कास्य पदकाची कमाई केली होती.

राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी यापूर्वी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात लक्ष्यभेदी कामगिरी केली. यात शहझार रिझवी, ओंकार सिंग आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केली होती. २०१८मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघितले जात आहे.