एकाच डावात हजार धावांची खेळी करुन ऐतिहासिक विक्रम रचणाऱ्या प्रणव धनावडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मैदानातील खेळीमुळे नाही तर ऐतिहासिक कामगिरीनंतर मिळालेली शिष्यवृत्ती नाकारल्यामुळे तो चर्चेत आलाय. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणवने एका डावात १२९ चौकार आणि ५९ षटकारांच्या मदतीनं नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती. त्याची ही खेळी एका डावातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. प्रणवच्या या कामगिरीनंतर प्रणव धनावडेला मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) दहा हजारांची मासिक शिष्यवृत्ती देण्यात आली.

गेल्यावर्षी केलेल्या या बहरादार खेळीनंतर प्रणवची कामगिरी समाधानकारक होताना दिसलेली नाही. कल्याण शहरात खेळासाठी आवश्यक सुविधा नाही. ज्या मैदानात त्याने विश्वविक्रम केला, त्या मैदानाची अवस्था बिकट आहे. याचा परिणाम प्रणवच्या कामगिरीवर झाला आहे. यामुळेच त्याच्या वडिलांनी शिष्यवृत्ती रद्द करण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिले आहे. चांगली कामगिरी होत नसेल तर शिष्यवृत्ती का घ्यावी? हा विचार करुन शिष्यवृत्ती रद्द करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. प्रणवला शिष्यवृत्ती दिल्याबद्दल त्यांनी एमसीएचे आभार मानले असून आगामी काळात चांगली कामगिरी केली तर शिष्यवृत्ती देण्याबाबत पुन्हा विचार करू शकता. तूर्तास त्याला दिली जाणारी शिष्यवृत्ती स्थगित करावी, असा उल्लेख प्रणवच्या वडिलांनी पत्रामध्ये केला आहे. प्रणवच्या या निर्णयामुळे कल्याणमधील मैदानातील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे.