एका डावात १००९ धावा करणारा पहिला खेळाडू; जगभरातून कौतुकाचा वर्षांव

कल्याणच्या प्रणव धनावडेने एकाच डावात हजार धावांची कल्पनातीत खेळी साकारत मंगळवारी ऐतिहासिक विक्रम रचला. १२९ चौकार आणि ५९ षटकार अशा अचंबित करणाऱ्या आकडेवारीसह प्रणवने नाबाद १००९ धावांची खेळी साकारली. ही खेळी हा एका डावातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेत (१६ वर्षांखालील) प्रणवने के. सी. गांधी संघाकडून खेळताना हा विक्रम केला. प्रणवच्या अफलातून खेळाच्या जोरावर कल्याणच्या के. सी. गांधी संघाने ३ बाद १४६५ धावांचा डोंगर उभा केला आणि आर्य गुरुकुल शाळेचा एक डाव व १३६२ धावांनी धुव्वा उडविला.

१४६५ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना कल्याणच्याच आर्य गुरुकुल संघाला दोन्ही डावांत मिळून १०३ धावाच करता आल्या. चिन्मय पाटील (५-३) आणि साहिल शेट्टी (३-१४) यांनी अचूक मारा करत आर्य गुरुकुल संघाचा पहिला डाव ३१ धावांवर, तर दुसऱ्या डावात आयुष कामतने हॅट्ट्रिकसह ८ बळी टिपून दुसरा डाव ७२ धावांत गुंडाळला. या कामगिरीच्या जोरावर के. सी. गांधी संघाने एक डाव व १३६२ धावा राखून ऐतिहासिक विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

आर्य गुरुकुल (कल्याण) : १७ षटकांत ३१ ( चिन्मय पाटील ५-३, ) व १४.५ षटकांत ७२ (आयुष कामत ८-१६) पराभूत वि. के. सी. गांधी इंग्लिश स्कूल (कल्याण) : ९४ षटकांत ३ बाद १४६५ धावा (प्रणव धनावडे नाबाद १००९, आकाश सिंग १७३, सिद्धेश पाटील १३७, शास्वत जगताप ५८)

प्रणव धनावडेने सोमवारी ६५२

धावांची खेळी साकारून ११७ वर्षांपूर्वीचा सर्वोत्तम वैयक्तिक धावांचा जागतिक विक्रम मोडला. ऑर्थर कॉलिन्स यांनी १८९९ साली वयाच्या १३ व्या वर्षी नोंदवलेल्या नाबाद ६२८ धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

प्रणवच्या झंझावाती खेळाच्या जोरावर के. सी. गांधी शाळेने १४६५ धावांचा डोंगर उभा केला. हाही एक विक्रमच ठरला. यापूर्वी १९२६ मध्ये व्हिक्टोरिया संघाने न्यू साऊथ वेल्सविरुद्ध ११०७ चा जागतिक विक्रम नोंदवला होता.

अभिनंदन प्रणव. एका डावात हजार धावा करणारा पहिला क्रिकेटपटूचा मान मिळवल्याबद्दल तुझे अभिनंदन. चांगली कामगिरी केली आणि खूप मेहनत घेतली. तुला आणखी यशोशिखर पादाक्रांत करायची आहेत.

 सचिन तेंडुलकर

खेळावर प्रेम केले की, खेळ तुमच्यावर प्रेम करतो. खेळाचा नेहमीच आदर करायला हवा. यापुढे त्याची जडणघडण कसे होते, हे फार महत्वाचे आहे. क्रिकेटमध्ये एकाग्रतेला फार महत्त्व असते. मोठय़ा स्तरावर खेळताना त्याला एकाग्रता अधिक वाढवावी लागेल, त्यावर मेहनत घ्यावी लागेल.

 अजिंक्य रहाणे

ही अद्भुत अशीच कामगिरी आहे. आता प्रणवची तुलना अन्य फलंदाजांबरोबर केली जाईल. माझ्या मते त्याने ही कारकीर्दीची सुरुवात आहे. यापुढे क्रिकेटमध्ये कशी अधिक सुधारणा करता येईल, याकडे प्रणवने लक्ष द्यावे. त्याने या घडीला फार मोठी स्वप्न न पाहता वर्तमानातील लक्ष्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. कोणत्या चेंडूवर कोणता फटका मारावा, हे त्याला उत्तम समजत आहे. ही गोष्ट फार कमी पाहायला मिळते. माझ्याकडून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.

महेंद्रसिंग धोनी

दैदिप्यमान खेळीसाठी प्रणवचे मनपूर्वक अभिनंदन. कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलच्या प्रणव धनावडेचा नाबाद १००९ हजार धावांचा विश्वविक्रम ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रणवच्या जागतिक विश्वविक्रमामुळे फक्त महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा गौरव वाढला आहे. प्रणवच्या या कामगिराचा राज्य सरकारच्या वतीने सन्मान करण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने प्रणवच्या क्रिकेट प्रशिक्षणाकरिता त्याला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, तर त्याच्या पुढील शिक्षणासाठीही सरकार भरीव मदत करेल,’’ असे आश्वासन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी  दिले.

विनोद तावडे, क्रीडा मंत्री

((  धनावडे १००९* धावा, ३२७ चेंडू, १२९ चौकार, ५९ षटकार  )))