भारताच्या एच. एस. प्रणयने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित बॅडमिंटनपटू तौफिक हिदायतला सरळ गेममध्ये हरवून भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खळबळ उडवून दिली.
पी. व्ही. सिंधू हिने पिछाडीवरून मुसंडी मारत चीनच्या यू सन हिचा पाडाव केला. एक तास आठ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूने १९-२१, २१-१९, २१-१५ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये प्रणयला संघर्ष करावा लागला; पण सुरेख खेळ करत प्रणयने ४० मिनिटांत हिदायतचा २६-२४, २१-९ असा धुव्वा उडवला.
प्रणयला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या गेममध्ये तो बराच पिछाडीवर पडला होता. पण आपल्या भात्यातील सुरेख फटके खेळत त्याने इंडोनेशियाच्या हिदायतविरुद्ध १६-१६ अशी बरोबरी साधली. ती पुढे २३-२३ अशी कायम राखली. त्यानंतर दोन गुण मिळवून प्रणयने पहिल्या गेमवर नाव कोरले.
दुसरा गेम एकतर्फी झाला. प्रणयने हिदायतला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. प्रणयने सुरुवातीलाच १०-३ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत प्रणयने दुसऱ्या गेमसह सामना सहज जिंकला.
सिंधू आणि सन यांच्यात चांगलाच थरार रंगला होता. सन हिने सिंधूपेक्षा सरस खेळ करत सामन्यात निसटती आघाडी कायम राखली होती. पण सिंधूने प्रत्येक वेळी पिछाडी भरून काढली. पहिल्या गेममध्ये १७-१७ अशा स्थितीतून सन हिने तीन गुण मिळवले. पण सिंधूने दोन गुण मिळवत सामन्यात रंगत आणली. अखेर सन हिने एक गुण मिळवून पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १३-१८ अशी मागे पडली होती. पण पाच गुण मिळवत तिने बरोबरी साधली. अखेरच्या क्षणी दोन गुण मिळवून दुसरा गेम जिंकत सिंधूने सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ११-११ अशा बरोबरीनंतर सुरेख खेळ करत सिंधूने वर्चस्व गाजवले.