News Flash

टेनिसच्या उपचाराने प्रांजलाच्या कारकीर्दीला उभारी!

बालपणी वारंवार आजारी पडणाऱ्या मुलीला तंदुरुस्तीसाठी म्हणून तिच्या पालकांनी टेनिस खेळायला पाठवले.

(संग्रहित छायाचित्र)

धनंजय रिसोडकर

बालपणी वारंवार आजारी पडणाऱ्या मुलीला तंदुरुस्तीसाठी म्हणून तिच्या पालकांनी टेनिस खेळायला पाठवले. ती अवघ्या दशकभरात भारतीय टेनिसच्या शिखराकडे झेपावली असून जागतिक क्रमवारीत ६२७व्या स्थानावरून वर्षभरात थेट २८०व्या स्थानापर्यंत पोहोचली आहे. हैदराबादच्या प्रांजला यडलापल्लीचा हा प्रवास थक्क करणारा असून, येत्या दोन वर्षांत ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये भारताचे नाव झळकावण्याचा निर्धार तिने केला आहे.

प्रांजलाला लहानपणीपासूनच सतत सर्दी, पडसे आणि घशाचा त्रास जाणवत असल्याने दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये न्यावे लागत होते. त्यातच डॉक्टरांनी तिची टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्यानंतर कुटुंबीय अधिकच चिंतेत पडले. त्यामुळे वडील किशोर येडलापल्ली यांनी मुलीची तंदुरुस्ती वाढावी म्हणून तिला घराजवळच असलेल्या टेनिस कोर्टवर टेनिस खेळायला पाठवण्यास प्रारंभ केला. प्रारंभी केवळ पालकांच्या इच्छेखातर खेळणाऱ्या प्रांजलाने काही काळातच टेनिसमध्ये चांगली गती पकडली.

कोर्टवरील तत्कालीन प्रशिक्षकांनीदेखील वयाच्या मानाने तिच्या फटक्यांमध्ये चांगली ताकद असून ती न थकता खूप काळ खेळत असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रशिक्षक सर्वच पालकांना असे प्रोत्साहन देत असतील, असा विचार करून प्रांजलाच्या पालकांनी प्रारंभी त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही स्थानिक स्पर्धामध्ये प्रांजला विजेतेपद पटकावू लागली, तेव्हा त्यांचे प्रशिक्षक संजय यांनी प्रांजलावर अधिक मेहनत घेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. त्यानंतर मग तिने मागे वळून न पाहता प्रगतीचे पुढचे टप्पे गाठण्याचा धडाकाच लावला.

वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी प्रांजलाने हा खेळ अधिक गांभीर्याने घेऊन १२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धाचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर पुढच्याच वर्षी प्रांजलाने १६ आणि १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १३ वर्षांच्या मुलीने तिच्यापेक्षा वयाने तीन ते पाच वर्ष मोठय़ा असलेल्या मुलींना पराभूत करून हे विजेतेपद पटकावले असल्याने राष्ट्रीय टेनिस क्षितिजावर एका नव्या तारकेचा उदय झाल्याची नोंद घेतली गेली. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धापेक्षा आयटीएफ स्पर्धावर लक्ष केंद्रित करून त्यातदेखील चमक दाखवली. प्रांजलाला जीव्हीकेचे प्रायोजकत्व लाभल्यानंतर तर तिच्या प्रशिक्षणात मौलिक भर पडत गेली. गेल्या तीन महिन्यांपासून प्रांजला थायलंडमध्ये स्टिफन कून यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून या काळात तिच्या टेनिसमध्ये खूप सकारात्मक बदल झाले आहेत. आता १९ वर्षांची झाल्याने शारीरिक तंदुरुस्तीदेखील बऱ्यापैकी वाढली असल्याने आता खऱ्या अर्थाने ती आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्यास सज्ज झाली आहे.

पुढील वर्षभरात सातत्याने चांगला खेळ करून अव्वल २०० खेळाडूंमध्ये आणि त्यानंतरच्या वर्षभरात अव्वल १०० खेळाडूंमध्ये पोहोचण्याचा मला विश्वास आहे. त्यामुळे ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याच्या माझ्या ध्येयापर्यंत मी नक्कीच पोहोचेन.     – प्रांजला यडलापल्ली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:21 am

Web Title: pranjals career grew with the treatment of tennis
Next Stories
1 रामकुमारचे एकेरीतील आव्हान संपुष्टात
2 महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अ‍ॅँडरसनचा सहभाग निश्चित
3 भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!
Just Now!
X