सलग दुसऱ्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात न आल्याने भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय प्रचंड नाराज झाला आहे. प्रणॉयने त्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेवर (बाइ) सडकून टीका केली आहे. प्रणॉयऐवजी यंदा सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीसह एकेरीतील खेळाडू समीर वर्माची अर्जुन पुरस्कारासाठी बॅडमिंटन संघटनेकडून शिफारस करण्यात आली आहे.

‘‘अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत पदके जिंकलेल्यांचा विचार होत नाही. ज्या खेळाडूंनी मोठय़ा स्पर्धामध्ये यश मिळवलेले नाही, त्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस केली जाते. देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ही हास्यास्पद बाब आहे,’’ अशी टीका प्रणॉयने केली. सात्त्विक आणि चिराग या जोडीने २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते मात्र समीर एकाही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळलेला नाही. त्यातच समीरची गेल्या वर्षीदेखील कामगिरी चांगली झाली नाही. २०१८मध्ये त्याने तीन स्पर्धा जिंकताना जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम ११वे स्थान मिळवले होते.

‘‘क्रीडा मंत्रालयाकडे पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करताना गेल्या चार वर्षांतील खेळाडूंची कामगिरी पाहण्यात येते,’’ असे बॅडमिंटन संघटनेने म्हटले आहे. प्रणॉयची गेल्या चार वर्षांमध्ये २०१८मधील कामगिरी सर्वात चांगली होती. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र प्रकारात जिंकलेल्या सुवर्णपदक संघात प्रणॉयचा समावेश होता. त्याच वर्षी वुहान आशिया स्पर्धेत कांस्यपदक जिंकत त्याने कारकीर्दीत सर्वोत्तम आठवे स्थान मिळवले. भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपनेही प्रणॉयची पाठराखण केली आहे. ‘‘पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी कोणते निकष वापरण्यात येतात, तेच कळत नाही. यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे,’’ असे कश्यपने सांगितले.

नीरज चोप्राची ‘खेलरत्न’साठी शिफारस

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भालाफेकपटू नीरज चोप्राची खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून (एएफआय) शिफारस करण्यात आली आहे. चोप्राची सलग तिसऱ्या वर्षी खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. आघाडीची महिला धावपटू द्युती चंद, अरपिंदर सिंग (तिहेरी उडी) आणि मनजीत सिंग (८०० मीटर) तसेच धावपटू पी. यू. चित्रा यांचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.

राणी ‘खेलरत्न’साठीच्या शिफारशीमुळे आनंदात

भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हॉकी इंडियाकडून खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याने अतिशय आनंदात आहे. ‘‘खेलरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस झाल्याने मी खूप आनंदात आहे. हॉकी इंडिया या संघटनेकडून मिळणारे प्रोत्साहन माझ्यासारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच बळ देत असते. वंदना कतारिया आणि मोनिका या दोघींची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाल्याने त्यांचेही अभिनंदन करते. भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे हेच यातून अधोरेखित होते,’’ असे राणीने सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली : करोनामुळे सर्व काही ठप्प असताना अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी २२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खेळाडूंनाही यादरम्यान स्वत:हून क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहेत. क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज भरण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. मात्र करोनामुळे अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करता ही मुदत वाढवण्यात आली आहे. करोनामुळे यंदा पुरस्कारांसाठीचे अर्ज फक्त ई-मेलवरून मागवण्यात येत आहेत. याआधी हे अर्ज संबंधित खेळांच्या क्रीडा संघटनांच्या शिफारसींवरूनच आल्यावर ग्राह्य़ धरण्यात येत होते. मात्र नवीन निकषांप्रमाणे जर एखाद्या खेळाडूने स्वत:हून पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज करण्याचे ठरवले तर ते त्याला करता येणार आहेत.