क्रिकेटचा सामना फक्त बॅट आणि चेंडूच्या जोरावरच जिंकला जात नाही. तो जिंकण्यासाठी हवी असते रणनीती, जिंकण्याची मानसिकता आणि पुरेपूर व्यावसायिकता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेनेजिंकलेली ट्वेन्टी-२० मालिका. त्यात त्यांनी केलेला भारताचा मानहानीकारक पराभव. एरवी आफ्रिकेचा संघ म्हणजे ‘चोकर्स’ असा ठपका बसलेला. मोठय़ा स्पर्धामध्ये जेतेपद मिळवू न शकलेला. द्वीदेशीय मालिकांमध्ये मात्र कोणालाही त्यांच्या मातीत जाऊन पाणी पाजणे हा त्यांचा हातखंडा खेळ आहे. ट्वेन्टी-२० मालिकेत त्यांनी तेच केले आणि त्याचबरोबर भारताला सावधानतेचा इशाराही दिला. तो इशारा अर्थातच पुढच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आहे. ही स्पर्धा आता आपल्याला सोपी राहिलेली नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.
या मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माचे शतक नजरेचे पारणे फेडणारे होते, पण ते वगळता उर्वरित संघाने या सामन्यात काय केले, हा मोठा प्रश्नच आहे. समोरचा संघ दोनशे धावांचा सहजपणे पाठलाग करतो, याला काय म्हणणार? रोहित शर्माच्या नावाबरोबर जसे काही विक्रम आहेत, त्याचबरोबर धावचीत हा शापही त्याला चिकटलेलाच. पहिल्या सामन्यात त्याच्याबरोबर शिखर धवन, दुसऱ्या सामन्यात विराट कोहली धावचीत झाले, दुसऱ्या सामन्यात तो स्वत:ही झालाच. यामधून त्यांनी काहीच बोध घेतलेला नाही. पहिल्या सामन्यात रोहितने चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही बाकीच्या खेळाडूंना सव्वा दोनशे धावांपर्यंत संघाची धावसंख्या फुगवता आली नाही. दुसरीकडे गोलंदाजांनीही शस्त्रे टाकली. पहिल्यांदा एबी डी’व्हिलियर्स आणि त्यानंतर जेपी डय़ुमिनी यांनी भारतीय गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. अक्षर पटेलच्या १५ व्या षटकात सलग तीन षटकार लगावत डय़ुमिनीने सामना फिरवला.
दुसऱ्या सामन्यात कोहली, रोहितने धावचीत होत केलेला आत्मघात आणि अन्य फलंदाजांना खेळपट्टीवरून पळ काढण्यात केलेली घाई आफ्रिकेला सामना आंदण देऊन गेली. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर पाय रोवता आला नाही. त्यांनी फक्त मोठे फटके मारण्यात धन्यता मानली आणि भारताचा डाव ९२ धावांवर आटोपला. इथून सामना जिंकणे अवघडच आणि तेच झाले.
आफ्रिकेचा संघ उष्ण वातावरणात येऊनही त्यांच्या कामगिरीत ढिसाळपणा नाही किंवा दुखापती नाही, यालाच व्यावसायिकपणा म्हणायला हवा. वातावरणाशी जुळवून घेण्यात त्यांना आठवडे किंवा महिना लागला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दवाचा फायदा मिळवण्यासाठी त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजीला येणे पसंत केले, ते त्यांच्या पथ्यावरही पडले. भारतात येऊन यजमानांना पराभूत करणे अवघड नसल्याचे या मालिकेने स्पष्ट केले आहे, पण भारतीय संघ यामधून काही धडा घेणार आहे का, हे महत्त्वाचे आहे.
अजिंक्य संघाबाहेर का?
क्रिकेटचा प्रकार कोणताही असो अजिंक्य रहाणेने आपले छाप पाडली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार म्हणूनही तो गेला होता. भारतीय फलंदाजीचा तो अविभाज्य भाग बनत असताना त्याला आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत का वगळण्यात आले, हे अनाकलनीयच आहे. अंबाती रायुडूपेक्षा त्याचा फॉर्म नक्कीच चांगला होता, मग माशी नेमकी कुठे शिंकली, हे कळण्यापल्याडचे.
कटकवासीयांकडून शोभा
सामना म्हणजे युद्धच आणि आपण ते जिंकायलाच हवे, ही मानसिकता भारतीयांनी बदलायला हवी. कटकमधला सामना हातचा जाणार असे वाटत असताना प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकून शोभा केली. यासारखे प्रकार रोखण्यासाठी बीसीसीआयनेही पावले उचलायला हवीत.
इडन गार्डन्स सुधारा
इडन गार्डन्स हे भारतातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक मैदान. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामना याच मैदानात होता. सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस थांबला तरी क्युरेटर आणि मैदानातील कर्मचाऱ्यांना मैदान खेळण्यालायक करता आले नाही. परिणामी सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली. याच मैदानावर ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे, ती गमावण्याची वेळ इडन गार्डन्सवर येऊ नये, हीच आशा.
धोनी युगाचा अस्त?
एकेकाळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची तुलना ‘मिडास राजा’शी केली जायची. यशाचे वादळ त्याच्या मागे घोंघावत असे. पण परिस्थिती बदलली आणि हा आवडता राजा नावडता बनू लागला. त्याच्यामधला ‘फिनिशर’ वयपरत्वे शांत झाला आहे.
हालचाली मंदावल्या आहेत. जे निर्णय धाडसी वाटायचे ते सपशेल फसताना दिसत आहे. त्यामुळेच धोनीची जादू संपली आहे का, कसोटीमधून धोनीने निवृत्ती घेतली खरी, आता ट्वेन्ट-२०, एकदिवसीय क्रिकेटमधून तो कधी संन्यास घेणार, असे प्रश्न उठू लागले आहेत. याचे आणखी एक कारण म्हणजे विराट कोहली नावाचा पर्याय आता समोर येत आहे.
–prasad.lad@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 2:51 am