देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे. राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेका राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर मार्च महिन्यात भारत श्रीचे अभूतपूर्व आयोजन आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया श्री या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. भारतातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू हे राज्यातूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.  आपल्या कार्यकालात दक्षिण आशियातील शरीरसौष्ठवाला आलेली मरगळ दूर करून पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचे आपले पहिले प्रयत्न असल्याचे आपटे म्हणाले. पॉल चुआ यांनी दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन, असा विश्वासही त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रं स्वीकारताना व्यक्त केला.

  • पुन्हा दिसणार दक्षिण आशियाई श्रीचा थरार

प्रशांत आपटे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताच येत्या एप्रिल-मे 2019 दरम्यान नेपाळमध्ये दक्षिण आशियाई श्री स्पर्धा घेणार असल्याचं जाहीर केले. या स्पर्धेत दक्षिण आशियातील भारतासह पाकिस्तानबांगलादेश,नेपाळभूतानश्रीलंका आणि मालदीव हे देशही आपले दंड थोपटतील. नेपाळपाठोपाठ 2020 सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद मालदीवला देण्यात आल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.  त्यामुळे दक्षिण आशियाई शरीरसौष्ठवाचा पीळदार संघर्ष पुन्हा एकदा शरीरसौष्ठवप्रेमींना नक्कीच पाहायला मिळेलअसा विश्वासही आपटे यांनी बोलून दाखविला.

महाराष्ट्र राज्याच्या शरीरसौष्ठव संघटनेने गेल्या चार वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धाजागतिक स्पर्धा तसेच अनेक देशपातळीवरच्या स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून राज्याने आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर नुकतीच पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्याने दिमाखदारपणे पार पाडलीय.  आपले खेळाडू श्रीमंत झाले तर आपला खेळही श्रीमंत होणारयाच उद्देशाने राज्य संघटना आपले कार्य प्रामाणिकपणे करत आलीय आणि यापुढे दक्षिण आशियातही असेच काम केले जाईलअसे आश्वासन नव्या अध्यंक्षांनी दिले. प्रशांत आपटे यांच्यासारख्या कार्यसम्राट संघटकामुळे राज्याची संघटना आणखी बलशाली झाली आहे आणि आता दक्षिण आशियाई संघटनाही ते त्याच जोशाने सक्षम करतीलअशा शुभेच्छा भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे यांनीही आपटे यांना दिल्या.