झहीर खानची क्रिकेट कारकीर्द तशी १५ वर्षांची, म्हणजे प्रदीर्घ. परंतु ही वाट साधी, सरळ मुळीच नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवण्याचं स्वप्न घेऊन श्रीरामपूर सोडून मुंबई गाठणाऱ्या झहीरच्या आयुष्यातील संघर्ष अखेपर्यंत संपला नाही. कारकीर्द स्थिरस्थावर करतानाच्या अनंत अडचणींवर झहीरनं मात केली. मग जवागल श्रीनाथसारखा वेगवान गोलंदाज संघात असल्यामुळे झहीरला स्थान मिळण्यासाठी आणि टिकवण्यासाठी लढा द्यावा लागला. श्रीनाथच्या निवृत्तीनंतर आपसूकच झहीरकडे भारताच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व चालून आलं. पण मग दुखापतींनी त्याच्या कारकीर्दीचा पिच्छा पुरवला. अन्यथा हा डावखुरा वेगवान गोलंदाज आजही भारतीय संघात दिसला असता. पण भारतीय संघात त्याच्या असण्यापेक्षा नसण्याची आकडेवारी वाढत गेली आणि त्याने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचं म्हणूनच कुणालाही आश्चर्य वाटलं नाही.

झहीर मूळचा अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. आई शिक्षिका आणि वडिलांचा छायाचित्रणाचा व्यवसाय. परंतु श्रीरामपूरमध्ये क्रिकेटसाठी अनुकूल वातावरण नव्हतं. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांला शिकत असताना १७ वर्षांचा झहीर क्रिकेटसाठी मुंबईत आला. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांनी त्याच्यामधील इच्छाशक्ती आणि गुणवत्ता हेरून त्याला १९९६ मध्ये नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये (एनसीसी) दाखल केले. झहीरला जेव्हा नाईक यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करायला सांगितली तेव्हा त्याच्या गोलंदाजीत वेग होता, परंतु लाइन आणि लेंग्थचा अभाव होता. या कच्च्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं शिवधनुष्य नाईक यांनी उचललं. मग एनसीसीच्या निधीतून त्याच्यासाठी गोलंदाजीचे शूज खरेदी केले. मुंबईतील सुरुवातीचे दिवस झहीरसाठी खूप हलाखीचे गेले. चर्नी रोडला वडिलांच्या मावशीचे सैफी इस्पितळात छोटेशे घर होते. याच घरी पहिले ७-८ महिने त्याने घालवले. झोपायला चादर मिळायची, पण उशी नाही. सकाळची न्याहारी मिळेलच याची शाश्वती नाही, अशी तिथं परिस्थिती होती. त्यामुळे झहीर दिवसभर खेळात किंवा नॅशनल क्रिकेट क्लबच्या तंबूत घालवायचा. फक्त रात्री झोपायला तो घरी जायचा. अखेरीस झोपेचा आसरा असलेल्या नातलगानंही झहीरला दुसरीकडे व्यवस्था करण्यास सांगितले. झहीरच्या वडिलांनी ही अडचण नाईक यांना सांगितली. मग नाईक यांनी हेमंत वायंगणकर यांच्याकडे झहीरचा प्रश्न मांडला. त्यामुळे झहीरला मफतलालमध्ये पाच हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. शिवाय राहण्यासाठी कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्थासुद्धा झाली. मग मेहनतीनं त्यानं मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवलं.

१९९७ मध्ये सलील अंकोलाला दुखापत झाल्यामुळे झहीरला रणजी संघात संधी मिळाली, परंतु अंतिम संघात मात्र त्याला स्थान मिळालं नाही. मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा आहे, हे लक्षात घेऊन झहीर बडोद्याच्या आश्रयाला गेला. १९९९ मध्ये बडोद्याकडूनच त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मग सात वर्षांनी २००६ मध्ये मुंबईनं सन्मानानं त्याला रणजी संघात स्थान दिलं. याच वर्षी शोएब अख्तरच्या जागी वॉर्केस्टरशायर संघानं झहीरला काऊंटी क्रिकेट खेळण्याची संधी दिली.

२००० साली झहीरला भारतीय संघाकडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करायची संधी मिळाली. सुरुवातीची काही वष्रे अन्य वेगवान गोलंदाजांची स्पर्धा असल्यामुळे आणि अखेरच्या काही वर्षांत दुखापतींनी घेरल्यामुळे झहीरच्या कारकीर्दीला मर्यादा आल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून वैशिष्टय़ जपणाऱ्या झहीरमध्ये क्रिकेटरसिकांना पाकिस्तानचा वसिम अक्रम जाणवायचा. ‘रीव्हर्स स्विंग’ ही पाकिस्तानी गोलंदाजांची मक्तेदारी. भारताच्या मनोज प्रभाकरला ही कला अवगत होती. पण झहीरच्या भात्यातील ते हुकमी अस्त्र होतं. कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात त्यानं रन-अप आणि चेंडू टाकताना मारली जाणारी उडी कमी केली. त्याचा त्याला खूप फायदा झाला. आशियाई देशांमध्ये जुना चेंडू तो कसबदारपणे वापरू लागला.

निवृत्तीप्रसंगी झहीरच्या खात्यावर ३११ कसोटी, २८२ एकदिवसीय आणि १७ ट्वेन्टी-२० असे एकंदर ६१० बळी जमा होते. आकडेवारीमध्ये कपिलदेवनंतर इतकी उंची गाठणारा झहीर हा दुसरा गोलंदाज. फिरकीला अनुकूल भारतीय खेळपट्टय़ांवरही मर्दुमकी गाजवणारा झहीर म्हणूनच लक्षात राहतो. २०११ मध्ये भारतानं विश्वविजेतेपद जिंकलं, यात झहीरचा सिंहाचा वाटा होता. त्यानं स्पध्रेत सर्वाधिक २१ बळी घेण्याची किमया साधली. विश्वचषकाच्या कारकीर्दीत सर्वाधिक ४४ बळी घेण्याचा भारतीय विक्रम श्रीनाथप्रमाणेच झहीरच्याही नावावर आहे. श्रीनाथने ३४ सामन्यांत हे यश मिळवले, तर झहीरने फक्त २३ सामन्यांत हा पराक्रम दाखवला आहे.

झहीर ९२ कसोटी सामने खेळला. परंतु कसोटीचं शतक पूर्ण न झाल्याची कोणतीही खंत निवृत्तीप्रसंगी त्याला वाटत नव्हती. भारतीय क्रिकेटची १५ वष्रे सेवा केल्याचं समाधान मोठं आहे, असं तो अभिमानानं सांगतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्यासाठी १५ तारीखच त्यानं निवडली. ‘‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करीत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात असेन. झ्ॉकस न्यू बिगिनिंग,’’ असे ‘ट्विटर’वर त्यानं नमूद केलं. झहीरची नवी खेळी कोणती असेल, याची तमाम क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे. भारताचा किंवा मुंबईचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून कदाचीत तो भविष्यात दिसू शकेल, नाही तर त्याने आणखी कोणती तरी झकास योजना आखली असेल. मेहनत आणि झोकून देण्याची वृत्ती अंगी असणाऱ्या झहीरची संघर्षगाथा आजच्या पिढीतील वेगवान गोलंदाजांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.