प्रशांत सुर्वे, रत्नागिरीचे प्रशिक्षक

प्रशांत केणी

रत्नागिरीच्या यशाचे श्रेय बचावाच्या अभेद्य तटबंदीला जाते. क्षेत्ररक्षणाचा समन्वय अप्रतिमरीत्या साधला गेल्याने चढाईपटूंना आत्मविश्वासाने आक्रमण करता आले, अशा शब्दांत प्रथमच राज्य अजिंक्यपद कबड्डी विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या रत्नागिरीचे प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांनी यशाचे रहस्य सांगितले.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या सुर्वे यांनी सात राष्ट्रीय आणि चार फेडरेशन चषक स्पर्धामध्ये बँक क्रीडा मंडळाचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य अजिंक्यपदामुळे रत्नागिरीमधील कबड्डीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास सुर्वे यांनी व्यक्त केला. रत्नागिरीच्या जेतेपदाच्या प्रवासासंदर्भात सुर्वे यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • रत्नागिरीच्या विजेतेपदासाठी खेळाडूंची मोट कशी बांधली?

शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे हे अनुक्रमे उजव्या आणि डाव्या कोपरारक्षकाची भूमिका बजावत होते, तर स्वप्निल शिंदे उजवा मध्यरक्षक आणि शेखर तटकरे डावा मध्यरक्षक होता. शुभम आणि स्वप्निलने यासाठी संपूर्ण सामन्यात मैदानावर राहण्याची सूचना देण्यात आली होती. चढाईपटूंना आक्रमक खेळण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रो कबड्डीचा अनुभव असलेल्या अजिंक्य पवारचा रत्नागिरीच्या विजयात सिंहाचा वाटा होता. कनिष्ठ अजिंक्य पवारचा आम्ही बाद फेरीच्या सामन्यांसाठी अचूक वापर केला. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याच्या भूमिकेविषयी त्याला सूचना देण्यात आल्या. सुनील दुबिलेनेही मोक्याच्या क्षणी गुण मिळवले.

  • राज्य अजिंक्यपदाच्या दृष्टीने तुम्ही संघाची तयारी कशा रीतीने करून घेतली?

रत्नागिरी कबड्डी संघटनेने मला संघनिवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यानंतर आपण विजेतेपद जिंकणारच, हे पहिल्या दिवसापासूनच खेळाडूंच्या मनावर बिंबवले. खेळाडूंकडे कौशल्य असल्याने आठ दिवस रणनीती आखून सरावाला प्राधान्य दिले. तंदुरुस्तीवर दररोज तीन तास मेहनत घ्यायचो. यात फुटबॉल, व्हॉलिबॉल यांचाही यात समावेश होता. स्वप्निल मला संघात हवा होता. यासाठी तीन महिने आधीच त्याला तशा सूचना देऊन वजन कमी करायला लावले. त्याने ९७ किलोचे वजन ८४ किलोपर्यंत खाली आणले.

  • उपांत्यपूर्व सामन्यात कोल्हापूर, उपांत्य सामन्यात रायगड आणि अंतिम सामन्यात मुंबईचे आव्हान कसे पेलले?

मी युनियन बँकेकडून बरीच वर्षे खेळत असल्याने प्रत्येक संघाच्या उणिवांचा व्यवस्थित अभ्यास केला होता. कोल्हापूर संघात डाव्या बचावफळीचा अभाव होता. मुंबईचे उजवीकडचे क्षेत्ररक्षण भक्कम नव्हते. त्यामुळे आम्ही त्यानुसार रणनीती आखली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंकज मोहितेला क्षेत्ररक्षण दूर ठेवून पळवले आणि कमी गुण देण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या चढाईपटूंच्या पकडी करणे आम्हाला कठीण गेले नाही.

  • प्रेक्षकांच्या गोंधळामुळे थांबलेला सामना तासाभराच्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू झाला. त्यावेळी सामन्याची लय पकडणे किती आव्हानात्मक ठरले?

सामन्यादरम्यान व्यत्यय आला, तेव्हा संयुक्त विजेतेपद देणे किंवा नाणेफेकीद्वारे विजेता ठरवणे, यावर चर्चा सुरू होती. परंतु काही काळाने सामना पुढे चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा सामन्यात परतणे अतिशय अवघड गेले. परंतु कबड्डीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रत्नागिरीच्या प्रेक्षकांच्या ऊर्जेने आम्ही सामन्याची लय पकडू शकलो. पण घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने पराभवाचे दडपणसुद्धा आमच्यावर होते.

  • रत्नागिरीसाठी हे राज्य अजिंक्यपद किती महत्त्वाचे आहे?

रत्नागिरी जिल्हा म्हणजे कबड्डीची खाण आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला गुणी खेळाडू या जिल्ह्य़ाने दिले आहेत. आतासुद्धा शालेय स्तरापासून येथील कबड्डीचा स्तर दर्जेदार आहे. या विजेतेपदाने यावर शिक्कामोर्तब केले. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आपण जिंकू शकतो, हा विश्वास आता दृढ झाला आहे. देवरूखला यंदा झालेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष आणि महिला गटांत प्रत्येकी १४ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. या भागातील विकासाला आता गती मिळेल.