20 January 2020

News Flash

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा!

गेली दहा वर्षे व्यावसायिक फुटबॉलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता मला राष्ट्रीय संघाचे वेध लागले आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रतीक चौधरी

मुंबई सिटी एफसीचा फुटबॉलपटू

तुषार वैती

गेली दहा वर्षे व्यावसायिक फुटबॉलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता मला राष्ट्रीय संघाचे वेध लागले आहे. एकदा राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी हुकल्यानंतर आता देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी जिवाचे रान करणार आहे, अशी इच्छा मुंबई सिटी एफसीचा फुटबॉलपटू प्रतीक चौधरी याने व्यक्त केली. २० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर फुटबॉल लीगमधील मुंबई सिटीच्या तयारीविषयी तसेच आतापर्यंतच्या प्रवासाविषयी प्रतीकशी केलेली ही बातचीत-

* कठीण परिस्थितीतून तू कसा मार्ग काढलास?

चेंबूरच्या सेंट सेबॅस्टियन हायस्कूलमध्ये शिकत असताना मित्रांसोबत फुटबॉल खेळायचो. त्यानंतर खेळाची आवड निर्माण झाल्यानंतर आरसीएफ कॉलनीच्या संघाकडून खेळू लागलो. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, युनियन बँकेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर एअर इंडियाच्या प्रशिक्षकांनी मला त्यांच्या संघाकडून खेळण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. दोन वर्षे एअर इंडियाकडून खेळल्यानंतर २०११ पासून मी व्यावसायिक फुटबॉलमध्ये उतरलो. आय-लीगमधील शिलॉँग लजाँग एफसी, मोहन बागान, मुंबई एफसी या संघांकडून खेळल्यानंतर इंडियन सुपर लीगमध्ये केरळ ब्लास्टर्स, दिल्ली डायनामोस, जमशेदपूर एफसी आणि आता मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधित्व करत आहे.

* घरच्यांचा विरोध असतानाही तू या खेळात कारकीर्द कशी घडवू शकलास?

लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. वडील इलेक्ट्रिशियन आणि आई घरकाम करायची. त्यामुळे माझ्या खेळण्याला कायम विरोध व्हायचा. घरात खेळाचे वातावरण नसल्यामुळे सारखा अभ्यास करण्यासाठी आईचा तगादा लागलेला असायचा. खेळात कारकीर्द घडू शकते, याची कल्पना त्यांना नव्हती. मात्र फुटबॉलमध्येच कारकीर्द घडवण्याची माझी इच्छा होती. एअर इंडियात नोकरी लागल्यानंतर घरच्यांचाही पाठिंबा मिळत गेला. आता आई माझा प्रत्येक सामना पाहते आणि जवळपासच्या शहरांतील प्रत्येक सामन्याला मैदानावर हजर असते.

* मुंबई सिटी एफसी या घरच्या संघाकडून खेळताना आता कसे वाटतेय?

ज्या शहरात मी वाढलो, त्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची सुरुवातीपासूनच इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे. केरळ, दिल्ली, जमशेदपूर संघांसाठी खेळल्यानंतर आता मुंबईकडून खेळताना वेगळ्याच भावना दाटून आल्या आहेत. इंडियन सुपर लीगच्या सहाव्या पर्वासाठी आमची तयारी उत्तम सुरू आहे. गेले दीड महिना आम्ही खडतर प्रशिक्षण घेत आहोत. त्याचबरोबर सराव सामन्यातही आमची कामगिरी चांगली होत आहे. संघातील सहकारी चांगले असून मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आता पहिल्या सामन्याची उत्सुकता आम्हाला लागून राहिली आहे.

* यापुढे तुझे ध्येय काय आहे?

देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. व्यावसायिक फुटबॉलला सुरुवात केल्यानंतर मी देशाकडून खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. आता १० वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत मला २०१३ मध्ये राष्ट्रीय शिबिरात जाण्याची संधी मिळाली होती; पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला त्या संधीचा फायदा उठवता आला नाही. आता ‘आयएसएल’च्या या मोसमात चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे माझे उद्दिष्ट आहे.

* या मोसमात मुंबई सिटी एफसीची रणनीती काय असेल?

फुटबॉलमध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. यंदाच्या मोसमात अ‍ॅटलेटिको कोलकाता आणि केरळ ब्लास्टर्सने चांगल्या खेळाडूंमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र ज्या दिवशी जो संघ चांगला खेळ करतो, तोच विजयी ठरतो. मुंबई सिटी एफसीनेही युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ साधला आहे. त्यामुळे प्रथम उपांत्य फेरी आणि नंतर विजेतेपद पटकावण्याचे आमचे ध्येय असेल.

* १७ वर्षांखालील विश्वचषक तसेच ‘आयएसएल’ या व्यावसायिक लीगचा फायदा भारताला कितपत झाला?

इंडियन सुपर लीगमध्ये देशात बरेच बदल झाले. लहानपणी आमच्या वेळी फुटबॉल अकादमी किंवा प्रशिक्षण शिबिरे फारशी नव्हती. स्पर्धाही मोजक्याच होत्या. आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघ तसेच रिलायन्स समूह फुटबॉलसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तळागाळातील फुटबॉलपटूंना घडवण्याचे कार्य सुरू आहे. आता युवा खेळाडूंच्या आगमनामुळे आणि नव्या प्रशिक्षकांमुळे भारतीय संघाची कामगिरीही सुधारत आहे. योग्य दिशेने भारताची प्रगती सुरू असून भविष्यात याची फळे भारताला नक्कीच मिळतील

First Published on October 14, 2019 2:07 am

Web Title: prateek chaudhuri desire to represent indian football team abn 97
Next Stories
1 महाराष्ट्राचा हिमाचल प्रदेशवर विजय
2 जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : मंजूला रौप्यपदक!
3 वाल्टेरी बोट्टासला विजेतेपद
Just Now!
X