|| प्रशांत केणी

भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचे मत

मागील विश्वचषकाचा उपविजेता न्यूझीलंड, ‘कचखाऊ’ हा शिक्का बसलेला दक्षिण आफ्रिका आणि गृहमैदानांवर खेळणारा इंग्लंड या संघांना यंदाचा विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी असेल. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे संघ बलाढय़  असले, तरी १९९२च्या विश्वचषकाप्रमाणे यंदा नवा जगज्जेता उदयास येऊ शकेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी व्यक्त केले आहे.

  • यंदाच्या विश्वचषकाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहात आहात?

मी १९९२ची विश्वचषक स्पर्धा खेळलो आहे. त्यावेळी जी राऊंड रॉबिन पद्धती वापरण्यात आली होती, त्याच पद्धतीचा वापर यंदाच्या विश्वचषकात होणार असल्यामुळे ती चुरशीची होईल. त्यावेळी पाकिस्तानला प्रथमच विश्वविजेतेपद मिळवता आले होते. राऊंड रॉबिन पद्धतीमुळे प्रत्येक संघाला संधी आहे. एक सामना गमावला म्हणून आव्हान संपुष्टात येण्याची भीती नाही, ही यातील सकारात्मकतासुद्धा आहे. नऊ सामन्यांच्या राऊंड रॉबिन पद्धतीत अखेपर्यंत जो संघ सातत्यपूर्ण कामगिरी करील, तोच उपांत्य फेरी गाठू शकेल. कागदावर कोणता संघ किती बलवान आहे, याला महत्त्व नसेल. ही स्पर्धा दीर्घकाळ चालणार असल्यामुळे तंदुरुस्तीची परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे साखळीतील अखेरच्या सप्ताहात जो संघ तंदुरुस्त असेल, ज्यांच्या कामगिरीत सातत्य असेल, तोच विश्वविजेता ठरेल. वेस्ट इंडिजला २००७मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला चाहत्यांचा नेहमीच उत्तम पाठिंबा मिळतो, तो विश्वचषकातही मिळेल.

  • इंग्लंडमधील वातावरण आणि भारताचा गोलंदाजीचा मारा याविषयी काय सांगाल?

इंग्लंडच्या वातावरणात गोलंदाजी अतिशय महत्त्वाची असते. तेथील वातावरणात चेंडू स्विंग होतो. पण विश्वचषकासाठी इंग्लिश वातावरणाला अनुकूल असा सामथ्र्यशाली गोलंदाजीचा मारा भारताकडे आहे, हे आशादायी चित्र बऱ्याच वर्षांनी दिसते आहे. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंडय़ा वेगवान माऱ्याची धुरा सांभाळत आहेत. रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू फिरकी गोलंदाज आपल्याकडे आहे. याशिवाय कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्या मनगटी फिरकीची भूमिका महत्त्वाची असेल.

  • दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांविरुद्ध भारताचे पहिले चार सामने आहेत. कर्णधार विराट कोहलीने या चार सामन्यांचे गांभीर्य पत्रकार परिषदेत विशद केले होते. याबाबत तुमचे मत काय आहे?

विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सुरुवात ही अत्यंत महत्त्वाची असते. यातील पराभव नंतर गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरतील. उत्तरार्धातील सामन्यांमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची स्पर्धा अधिक तीव्र होते. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्येच बलाढय़ प्रतिस्पर्ध्याना हरवून गुणतालिकेत पुढे राहणे महत्त्वाचे ठरते. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने सुरुवातीचे सहा सामने गमावल्यानंतर त्यांना उर्वरित स्पर्धेत झगडावे लागले. पूर्वार्धातील खडतर आव्हाने भारताने पेलल्यास पुढील वाटचाल उत्तम होऊ शकेल.

  • यंदाच्या विश्वचषकात भारताचा कोणता खेळाडू छाप पाडेल, असे तुम्हाला वाटते?

अष्टपैलू हार्दिक या विश्वचषकात नक्कीच छाप पाडेल. ‘आयपीएल’मधील त्याच्या कामगिरीतून तो विश्वचषकासाठी सज्ज असल्याचेच दिसून येत होते. विश्वचषकातील सामने जिंकण्यासाठी उत्तम सलामी महत्त्वाची असते. रोहित शर्मासुद्धा लक्षवेधी खेळी साकारेल, अशी माझी अपेक्षा आहे.

  • महेंद्रसिंह धोनीच्या वयाची आणि कामगिरीची नेहमीच चर्चा होते. पण विश्वचषकाच्या दृष्टीने तुम्ही धोनीकडे कसे पाहता?

विश्वचषकाप्रमाणे मोठय़ा स्पर्धेला सामोरे जाताना तुमच्याकडे देशाला दोनदा विश्वविजेतेपद जिंकून देणारा कर्णधार धोनीचा अनुभव उपयुक्त ठरेल. भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे त्यांना कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन करण्याची क्षमता धोनीकडे आहे. यष्टीरक्षण, फलंदाज आणि रणनीती ही त्याची प्रमुख कौशल्ये आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये धोनीने आपल्या चतुरस्र कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जला अंतिम फेरीपर्यंत नेले. त्याच्या खात्यावरील धावाच बोलक्या आहेत. त्यामुळे त्याच्यासारखा ‘विजयवीर’ संघात असणे फायदेशीर ठरेल.

  • ‘आयपीएल’मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे तुम्ही प्रशिक्षक होतात. या संघातील ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्याकडे भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. तुमचे त्यांच्याविषयी काय मत आहे?

ऋषभ, श्रेयस आणि पृथ्वी या तिन्ही खेळाडूंची निवड करतानाच काही विशिष्ट दृष्टिकोन आमच्याकडे होता. कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२० किंवा ‘आयपीएल’ खेळा. परंतु विश्वचषक हा कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीतील एक मानाचा तुरा असतो. विश्वचषकात राष्ट्रगीत चालू असतानाची भावनिकता वेगळी असते, असे असंख्य सल्ले मी या तिघांना दिले आहेत. आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवले, तर पुढील विश्वचषकात ते भारताचे नक्की प्रतिनिधित्व करतील.

नऊ सामन्यांच्या राऊंड रॉबिन पद्धतीत अखेपर्यंत जो संघ सातत्यपूर्ण कामगिरी करतो, तोच उपांत्य फेरी गाठू शकेल. कागदावर कोणता संघ किती बलवान आहे, याला महत्त्व नसेल. ही स्पर्धा दीर्घकाळ चालणार असल्यामुळे तंदुरुस्तीची परीक्षा ठरणार आहे.