जे भारतीय खेळाडू भारताच्या संघात आपलं स्थान टिकवण्याच्या शर्यतीमध्ये नाहीत, त्यांना विदेशी टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी असे मत फलंदाज सुरेश रैना आणि माजी गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले होते. त्यांनी BCCI कडे यासंदर्भातील मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्याशिवाय BCCI आपल्या कोणत्याही खेळाडूला विदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे भारताच्या ४८ वर्षीय फिरकीपटू प्रवीण तांबेला निवृत्ती स्वीकारावी लागली.

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (CPL) त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघातून खेळण्यासाठी लेग स्पिनर प्रवीण तांबेने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्याला विदेशी टी-२० लीग स्पर्धा खेळण्यापासून रोखू शकणार नाही. कारण त्याने ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. त्याने पहिल्यांदा स्वीकारलेली निवृत्ती नंतर मागे घेतली होती. पण आता तांबेने निवृत्ती स्वीकारल्याच्या वृत्ताला मुंबई क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. याचसोबत तांबेच्या नावे एक विक्रमही होणार आहे. ४८ वर्षीय तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

‘‘मुंबई क्रिकेट संघटनेकडे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार तांबे निवृत्त क्रिकेटपटू आहे. कारण त्याने संघटनेला ई-मेल पाठवून याविषयी कळवले आहे,’’ असे पदाधिकाऱ्याने सांगितले. तांबेने ३३ IPL सामन्यांत ३०.५ च्या सरासरीने २८ बळी मिळवले आहेत. गेल्या वर्षी IPL लिलावामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने तांबेला २० लाख रुपयांच्या बोलीसह संघात स्थान दिले होते. परंतु टेन-१० लीगमध्ये खेळल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले होते. देशातील कोणत्याही क्रिकेटपटूला आतापर्यंत भारताबाहेरील लीगमध्ये खेळण्याची परवानगी ‘बीसीसीआय’ने दिलेली नाही. केवळ गेल्या वर्षी युवराज सिंगने कॅनडातील ग्लोबल टी २० स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलं होतं. विदेशी टी २० लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.