खेळाडूला वयाचे बंधन असते असे म्हटले जाते, पण दमदार कामगिरीपुढे कुणाचे काहीही चालत नाही, याचाच प्रत्यय मुंबईकरांना येणार आहे. कारण झारखंडविरुद्ध होणाऱ्या रणजी सामन्यासाठी मुंबईच्या संघात ४२ वर्षीय ‘लेग स्पिनर’ प्रवीण तांबेची निवड झाली आहे. हा सामना ६ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
आतापर्यंत मुंबईकडून एकही रणजी सामना न खेळलेल्या प्रवीणने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच फिरकीच्या धारेवर धरले होते. त्यामुळे या कामगिरीच्या जोरावर त्याची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली आहे. प्रवीणबरोबरच सागर केरकर आणि मनीष राव यांचाही मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. झहीर खान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्यामुळे अभिषेक नायरकडे कर्णधारपद देण्यात आले असून यष्टिरक्षक आदित्य तरे संघाचा उपकर्णधार असेल.
मुंबईचा संघ : अभिषेक नायर (कर्णधार), आदित्य तरे (यष्टिरक्षक आणि उपकर्णधार), वसिम जाफर, हिकेन शाह, सूर्यकुमार यादव, सुशांत मराठे, विशाल दाभोळकर, सिद्धेश लाड, शार्दुल ठाकूर, जावेद खान, अकबर खान, क्षेमल वायंगणकर, मनीष राव, सागर केरकर आणि प्रवीण तांबे.