28 March 2020

News Flash

Cricket World Cup 2019 : फ्री हिट : विश्वचषक व्रत कथा

जगभरात नावलौकिकाचा धनी होता येतं आणि प्रसिद्धीच्या पाठोपाठ धनलक्ष्मीचीही कृपा होते, अशी श्रद्धा आहे.  

संतोष सावंत

व्रताची माहिती

‘विश्वचषक व्रत’ हे जगभरातील विविध देशांत आचरणात आहे. या व्रताचा उद्देश विश्वचषकप्राप्ती हा असून हे व्रत चषकाला प्रसन्न करून घेण्यासाठी करण्यात येतं. आज कलियुगात आपल्या भारत देशात हे व्रत मोठय़ा प्रमाणात करण्यात येत असलं तरी याची मुळे पाश्चात्त्य संस्कृतीत रुजलेली दिसतात. हे व्रत केल्याने अपार कीर्ती प्राप्त होते, जगभरात नावलौकिकाचा धनी होता येतं आणि प्रसिद्धीच्या पाठोपाठ धनलक्ष्मीचीही कृपा होते, अशी श्रद्धा आहे.

व्रताची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगराचं नाव इंग्लंड होतं. तिथे अनेक सद्गृहस्थ राहात होते. आपल्या कुटुंबीयांसोबत त्यांचा सुखेनैव संसार सुरू होता. हे सारे लोक देवभक्त होते. देवावर त्यांची गाढ श्रद्धा होती. यांच्यातील एका सद्गृहस्थाला १९७५मध्ये एके रात्री दृष्टांत झाला की, चषकाच्या महाजत्रेचे आयोजन चार वर्षांतून एकदा करावं. असं केलं तर चषकाची कीर्ती त्रिखंडात पसरेल आणि त्यांच्या नगरालाही लक्ष्मीदेवीचा वरदहस्त लाभेल. सकाळ होताच त्याने याबाबत आपले कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना सांगितलं आणि मग त्या सत्शील गृहस्थाने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे आपल्या आप्तस्वकीयांसोबत भक्तिभावपूर्वक हे व्रत आचरिलं असता देव प्रसन्न झाले. तेव्हापासून कलियुगी हे व्रत सकळजन मोठय़ा भक्तिभावाने करू लागले.

व्रत कसं करावं

आपल्या देशाच्या संघाच्या जन्मापासूनच हे व्रत सुरू करावं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच मार्गानं देवाची यथाशक्ती आराधना करत राहावं. आपल्या देशात तर मनोभावे पूजन करावंच, पण अधूनमधून परकीय भूमीवरही अशा पूजांचं आयोजन करावं. यासाठी परदेशी तज्ज्ञांकडे पौरोहित्य सोपवल्यास व्रताचं फळ अधिक मधुर मिळतं अशी आख्यायिका आहे. आपण स्वत: तर हे व्रत प्रामाणिकपणे करावंच, परंतु आपल्यासारखी जी इतर देशांतील मंडळी हे व्रत करत आहेत, ती नेमकं काय करीत आहेत, याकडेही कटाक्षानं लक्ष पुरवावं. व्रतात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. चार वर्षांचं हे खडतर व्रत पूर्ण करण्यासाठी सतत सजग राहावं लागतं. सातत्याने परिश्रम करावे लागतात. आपल्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागते.

फलप्राप्ती

एकदा का हे व्रत सफळ संपूर्ण झालं की मग देव प्रसन्न होतात आणि विश्वचषकाची प्राप्ती होते. यानंतर पुढील चार वर्षांपर्यंत देवाच्या कृपेने सुखाचा आणि कौतुकाचा पाऊस आपल्यावर पडत राहतो. हे व्रत मनाजोगतं पूर्णत्वास जावं म्हणून मोठय़ा मैदानात सामूहिकरीत्या दररोज सकाळ-संध्याकाळ पुढील आरती मनोभावे म्हणावी, असं शास्त्रात सांगितलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 2:59 am

Web Title: prayers offered for india success in cricket world cup 2019 zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019 : ड्रोनच्या नजरेतून : राऊंड रॉबिन पद्धतीचे उणेपण..?
2 cricket world cup 2019 : बांगलादेश उपांत्य फेरी गाठेल; मोर्तझा आशावादी
3 cricket world cup 2019 सेलिब्रिटी कट्टा : अनेक विक्रम आजही लक्षात!
Just Now!
X