भारतीय संघाचा रविवारी इंग्लंडविरुद्ध पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ कसोटी मालिकेतील विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेतही विजयीरथ कायम राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. नुकतेच धोनीने संघाचे कर्णधारपद सोडून कोहलीला संधी दिली. त्यामुळे कोहलीच्या कर्णधारी कामगिरीसाठी यंदाच्या वर्षीची ही पहिली एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे धोनी नेतृत्त्व करणार नसला तरी तो संघाचा सहभागी खेळाडू असणार आहे. शिवाय यावेळी संघात युवराज सिंग याचेही तीन वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. पुण्याच्या खेळपट्टीचा विचार करता कोहलीच्या अंतिम अकरा जणांच्या संघात कोणाला स्थान मिळेल? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कसोटी मालिकेत इंग्लंडकडून चांगली कामगिरी झालेली नसली तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाची गणितं खूप वेगळी आहेत. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडची कामगिरी कसोटीपेक्षा खूप वरचढ राहिली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला गृहित धरून चालणार नाही. नुकतेच्या झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडने भारताच्या अ संघाचे ३०५ धावांचे आव्हान सहज गाठले होते. त्यामुळे विजयी सुरूवात मिळविण्यासाठी विराट कोहली कोणत्या खेळाडूंना प्राधान्य देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

सलामीसाठी केएल राहुल आणि शिखर धवन ही जोडी दिसू शकेल. तर तिसऱया स्थानावर खुद्द विराट कोहली फलंदाजीसाठी येईल. त्यानंतर मधल्या फळीत धोनी, युवराज सिंग आणि मनिष पांडे दिसू शकतात. हार्दिक पंड्या या अष्टपैलूचा संघाचा समावेश होऊ शकतो. त्यानंतर आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्याकडे फिरकीची जबाबदारी असेल, तर उमेश यादव आणि जसप्रित बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

असा असू शकतो भारतीय संघ-
केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, मनिष पांडे, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, हार्दिक पंड्या, उमेश यादव आणि जसप्रित बुमराह