नागपूर, मुंबई, पुणे आणि नाशिक या संघांनी नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सुरेख कामगिरी करत विविध गटांमध्ये विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात नागपूरने मुंबईवर मात केली. पहिल्या एकेरीत रोहन गुरवानीने मुंबईच्या राहिल पारीखला २१-१२, २१-१६ असे तर, दुहेरीत रोहनने सुधांशू भुरेच्या साथीने मुंबईच्या राहिल पारीख-राहुल व्यास जोडीला २१-०२, २१-१० असे हरविले. या पराभवाचा बदला मुंबईच्या मुलींनी नागपूरला पराभूत करून घेतला. मुंबईच्या आर्या शेट्टीने मालविका बनसोडेवर २१-१०, २१-०३ अशी मात केली. दुहेरीत आर्या शेट्टी-सिमरन सिंघी जोडीने मालविका-लिव्हिया फर्नाडिस जोडीला २१-११, २१-१४ असे पराभूत केले.
१७ वर्षांखालील गटात पुण्याने नाशिकवर मात केली. अनिरुद्ध मयेकरने नाशिकच्या अजिंक्य पाथरकरला २१-१७, २१-१४ तर, दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकर-तनय आखेगांवकर यांनी अथर्व चुरी-अनिरुद्ध मयेकर जोडीला २१-०७, १६-२१, २४-२२ असे पराभूत करून सामना रंगतदार स्थितीत आणला. परंतु दुसऱ्या एकेरीत अथर्वने तनयवर २१-१२, २२-२४, २१-१२ असा विजय मिळविला. या गटात मुलींमध्ये नागपूरने मुंबईवर मात केली.  मुंबईच्या कल्पिता सावंतने राशी लांबेविरूध्द, दुहेरीत पल्लवी पितळे-मुग्धा आग्रे यांनी कल्पिता सावंत-राधिका डगांवकर यांच्यावर तर, दुसऱ्या एकेरीत मुग्धाने डगांवकरला हरविले.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये नाशिकने पुण्याला पराभूत केले. एकेरीत सारंग देशपांडेने नाशिकच्या प्रणव पाटीलवर तर, दुहेरीत प्रणव-शुभम या पाटील जोडीने पुण्याच्या सारंग व अथर्व देवधर जोडीला हरविण्याची किमया केली. दुसऱ्या एकेरीत शुभमने  पुण्याच्या निखील कोठावळेला पराभूत केले. याच गटात पुण्याच्या मुलींनी मुंबईवर सहज मात केली.