प्रीमिअर बॅडमिंटनच्या लीगच्या चौथ्या पर्वाला आजपासून मुंबईत प्रारंभ; सिंधू-मरिन आमनेसामने

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या चौथ्या पर्वाला शनिवारपासून मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) मैदानावर प्रारंभ होणार आहे. हैदराबाद हंटर्स आणि पुणे ७ एसेस यांच्यातील लढतीने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे.

या लढतीत ऑलिम्पिक सुवर्ण विजेती कॅरोलिना मरिन (पुणे) आणि वर्ल्ड टूर फायनल्सची विजेती पी.व्ही.सिंधू (हैदराबाद) यांच्यातील लढतीविषयी क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पुण्याच्या नवीन संघाचा अंतर्भाव स्पर्धेत करण्यात आल्याने स्पर्धेतील रंगत यंदा अधिकच वाढणार आहे.

जगभरातील एकूण १७ देशांमधील ९० अव्वल बॅडमिंटनपटूंचा समावेश यंदाच्या लीगमध्ये आहे. २२ डिसेंबरपासून १३ जानेवारीपर्यंत सलग ५ शहरांमध्ये लीगचे सामने होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ कोटी रुपये, उपविजेत्याला १.५ कोटी रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ संघाला ७५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

सर्व कर्णधारांनी आपला संघ चांगल्या तयारीत असल्याने यंदाचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्यानेच स्पर्धेत उतरलो असल्याचे सांगितले. चौथ्या हंगामाबाबत समाधान प्रकट करताना सायना म्हणाली, ‘‘वर्षभर एकेरीत बॅडमिंटन खेळत असताना अशा सांघिक उपक्रमातून वेगळाच आनंद मिळतो. खेळाडूंच्या दृष्टीने वर्षअखेर असल्याने बरेच खेळाडू वर्षअखेरीस दमलेले असतात. मात्र या सांघिक लीगमध्ये खेळाडूंना लढतींच्यादरम्यान चांगली विश्रांती मिळते. आमच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा बॅडमिंटनचा उत्सवच असतो.’’  लीगची मुक्तकंठाने प्रशंसा करताना सिंधू म्हणाली, ‘‘बॅडमिंटन लीगच्या या उपक्रमामुळे उगवत्या बॅडमिंटनपटूंना व्यासपीठ मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे.तसेच एकूणच बॅडमिंटनच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरत आहे.’’

आजचा सामना

  • हैदराबाद हंटर्स वि. पुणे ७ एसेस
  • वेळ : सायं. ७ वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १