सहावी प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) करोना साथीमुळे पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे यंदाची ‘पीबीएल’ डिसेंबरमध्ये दिल्ली, मुंबई आणि पुणे येथे होणार होती. मात्र सध्याच्या करोनाच्या स्थितीमुळे डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणे अशक्य असल्याचे या स्पर्धेचे आयोजक स्पोर्ट्झलाइव्हकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘पाच वर्षांत पीबीएलच्या आयोजनासाठी डिसेंबर-जानेवारी हा काळ मिळत होता. मात्र करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधदेखील ३१ डिसेंबपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. त्या दृष्टीने ‘पीबीएल’चे आयोजन कठीण आहे,’’ असे स्पोर्ट्झलाइव्हचे प्रमुख प्रसाद मांजीपुडी यांनी सांगितले.
‘‘यंदाची पीबीएल ही पुणे, मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये होणार होती. मात्र याच शहरांमध्ये करोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. त्यातच आशियामधील बॅडमिंटन स्पर्धादेखील जानेवारीमध्ये आणि त्यानंतर ऑलिम्पिकची पात्रता फेरी होणार आहे. मात्र ऑलिम्पिकआधी पीबीएलचे आयोजन होईल अशी अपेक्षा आहे. करोनाची लस विकसित होईल आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास तुलनेने सोपा होईल असा विश्वास आहे,’’ असे मांजीपुडी यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 12:19 am