प्रीमियर स्किल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जेरेमी विक्स यांचे मत

मुंबई : इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि दोन वर्षांपूर्वी झालेली कुमारांची (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यामुळे भारतीय फुटबॉलला कलाटणी मिळाली आहे. या दोन स्पर्धामुळे देशातील पायाभूत सोयीसुविधा, स्टेडियम्स या सर्व गोष्टींची कमतरता भरून निघाली आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलचा दर्जा कमालीचा उंचावला आहे, असे मत इंग्लिश प्रीमिअर लीगच्या प्रीमियर स्किल्स संघाचे प्रशिक्षक जेरेमी विक्स यांनी व्यक्त केले.

‘‘सध्या इंडियन सुपर लीग स्पर्धात्मक होऊ लागली आहे. परदेशातील अनेक खेळाडू भारतात येऊन खेळत आहेत. त्यामुळे भारतीय फुटबॉल एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचले आहे. मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड यांसारख्या मातब्बर क्लबचे प्रशिक्षक भारतात येऊन येथील स्थानिक प्रशिक्षकांना प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे भारतात प्रशिक्षकांची नवी फळी तयार होत आहे, ज्यांच्याकडून खेळाडू घडवण्याचे कार्य निरंतर सुरू राहणार आहे. बऱ्याच प्रशिक्षकांना प्रशिक्षणाची संधी मिळत नाही. पण आयएसएल, आय-लीग आणि अन्य स्पर्धामधील संघांची संख्या वाढू लागल्यामुळे त्यांनाही व्यासपीठ मिळत आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

इंग्लिश प्रीमियर लीग आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या सहकार्याने जेरेमी विक्स आणि ग्रॅहम रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या नवी मुंबईत भारतीय प्रशिक्षक तसेच सामनाधिकाऱ्यांना घडवण्याचे कार्य सुरू आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातून जवळपास १७ प्रशिक्षक आणि ३० सामनाधिकारी सहभागी झाले आहेत.

२०२०मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या विश्वचषक स्पर्धेविषयी ते म्हणाले, ‘‘१७ वर्षांखालील महिलांचा विश्वचषक भारतात होतोय, ही खूपच चांगली बातमी आहे. महिला फुटबॉल हा सध्याच्या घडीला संपूर्ण जगभर झपाटय़ाने वाढणारा हा खेळ आहे. या खेळात कारकीर्द घडवणाऱ्या महिलांसाठी हा विश्वचषक नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मला वाटते.’’