‘‘दडपणाविषयी माणसे नकारात्मक पद्धतीने विचार करतात. माझ्यासाठी दडपण म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असते. मी तरी याच पद्धतीने त्याकडे पाहतो. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या देशासाठी किंवा संघासाठी नायक होण्याची संधी देतो, तेव्हा तुम्ही त्याला दडपण कसे म्हणाल!’’.. महेंद्रसिंग धोनीचे हे विचार त्याच्या खंद्या नेतृत्वगुणाची साक्ष देतात.
धोनी म्हणजे भारताला पडलेले एक सोनेरी स्वप्न. क्रिकेटची कारकीर्द सांभाळत खरगपूर रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसाची नोकरी करणारा धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी संघनायक झाला. ‘रांचीचा राजपुत्र’ असे बिरुद मिरवणाऱ्या धोनीने झारखंडला जागतिक क्रिकेटच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. धोनीने आतापर्यंतच्या सर्वच ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. तसेच आयपीएलचाही विपुल अनुभव त्याच्या गाठीशी आहे. धोनी पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती २००७ मध्ये. हे वर्ष भारतासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ची अनुभूती देणारे ठरले होते. कॅरेबियन बेटांवर झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेत भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. त्यामुळे राहुल द्रविडला आपले कर्णधारपद सोडावे लागले. मग युवा महेंद्रसिंग धोनीकडे ते सोपवण्यात आले. या पाश्र्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या विश्वचषकात भारतीय संघाकडून माफकच अपेक्षा करण्यात येत होत्या; परंतु धोनीने ताज्या दमाच्या ख्ेाळाडूंना घेऊन चमत्कार घडवला व पहिल्या विश्वचषकावर मोहर उमटवली. तेच यश पुन्हा प्राप्त करण्यासाठी धोनीने संघबांधणी केली आहे. युवराज सिंग, हरभजन सिंग आणि आशीष नेहरा हे ट्वेन्टी-२०मधील सध्याच्या तरुणाईच्या युगात खिजगणतीत नसलेल्या ताऱ्यांवर धोनीने विश्वास प्रकट केला. जसप्रित बुमराह, हार्दिक पंडय़ा यांसारखी आजची पिढी, यासोबत विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, सुरेश रैना, शिखर धवन आदी नेहमीच्याच यशस्वी शिलेदारांसह धोनीने मोट बांधली आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर ट्वेन्टी-२० मालिकेत नमवण्याची किमया साधल्यानंतर भारताने कात टाकली. मग भारतात श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकली व त्यानंतर आशिया चषकावर नाव कोरले. मागील ११ ट्वेन्टी-२० सामन्यांत १० विजय मिळवत हा अश्वमेध आता ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अनुकूल खेळपट्टय़ांवर भारताला विजयाची सर्वाधिक संधी आहे, हे बहुतांशी संघ मान्य करीत आहेत.
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम ‘फिनिशर’ धोनीला म्हटले जाते. वानखेडेवर ‘जगज्जेतेपद आमचेच’ हे नमूद करणारा विजयी षटकार क्रिकेट इतिहासात अजरामर झाला आहे. याशिवाय त्याच्या भात्यातील ‘हेलिकॉप्टर’चा फटका, नव्हे कठीण प्रसंगातील एक अस्त्रच आहे. आता धोनी पस्तिशीकडे झुकला आहे. याची पुरती जाणीव झाल्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने आधीच निवृत्ती पत्करली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आता भारतीय कसोटी संघ स्थिरस्थावर झाला आहे. दोन विश्वचषक व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये देशाला अव्वल क्रमांक मिळवून देणारा धोनीच्या कारकीर्दीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळेच भारतात अनुकूल वातावरणात देशाला पुन्हा एकदा जगज्जेतेपद मिळवून द्यायचे व समाधानाने निवृत्ती पत्करावी, असे आखाडे त्याने बांधले आहेत. ‘हात लावेल, तिथे सोने होईल’, अशी मिडास राजाची आख्यायिका होती. क्रिकेटजगतामध्ये धोनीच्या यशाबद्दलही असेच म्हटले जाते. तूर्तास, धोनीच्या परिसस्पर्शाने आणखी एका जगज्जेतेपदाला भारत गवसणी घालणार का, हे पाहू या!