दोन्ही एकदिवसीय सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आता निर्भेळ यशाचे वेध लागले आहेत. दुसरीकडे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने गमावल्यामुळे यजमान झिम्बाब्वेकडे मंगळवारी होणारा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याची अखेरची संधी असेल.
पहिला एकदिवसीय सामना अटीतटीचा झाला होता, या रोमहर्षक सामन्यात भारताने अवघ्या चार धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या विजयापेक्षा दुसरा सामना भारताने सहजपणे खिशात टाकला होता. दुसरा सामना भारताने ६२ धावांनी जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत आणखी मोठय़ा फरकाने विजय मिळवणार का, की झिम्बाब्वेचा संघ विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड करणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
दुसऱ्या सामन्यात सलामीवीर अजिंक्य आणि मुरली विजय यांनी दमदार फलंदाजी केली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आतापर्यंत अंबाती रायुडूच्या पहिल्या सामन्यातील शतकी खेळीचा अपवाद वगळता मधल्या फळीतील एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आलेली नाही आणि हीच संघाची डोकेदुखी आहे. मधल्या फळीतील युवा फलंदाजांसाठी ही नामी संधी असली, तरी त्याचा फायदा त्यांना उचलता आलेला नाही. रायुडू दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नसून, त्याच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. पण सॅमसनपेक्षा या सामन्यात मनीष पांडेला स्थान देण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजीमध्ये मध्यमगती आणि चेंडू उत्तम स्विंग करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने चांगला मारा केला आहे. त्याला मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीची चांगली साथ मिळत आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये हरभजन सिंग आणि अक्षर पटेल चांगली कामगिरी करत आहेत. भारताने ही मालिका जिंकली असून, या सामन्यात कोणत्या राखीव खेळाडूंना संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
झिम्बाब्वेच्या संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली असली, तरी फलंदाजांमुळे त्यांना दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर चामू चिभाभा आणि कर्णधार एल्टन चिगुंबुरा यांचा अपवाद वगळता फलंदाजांनी पुरती निराशा केली आहे.

दुखापतग्रस्त रायुडूऐवजी सॅमसन
हरारे : झिम्बाब्वे दौऱ्यावरील भारताचा फलंदाज अंबाती रायुडूच्या उजव्या पायाच्या मांडीतील स्नायूंना दुखापत झाली असून, त्याच्याजागी संघात यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला स्थान देण्यात आले आहे. ‘‘वैद्यकीय समितीने दिलेल्या माहितीनुसार अंबाती रायुडूच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी रायुडूला २-३ आठवडय़ांचा कालावधी लागणार असून, त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला स्थान देण्यात आले आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्रकात म्हटले आहे.

संभाव्य संघ
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, संजू सॅमसन, संदीप शर्मा आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्व्हा (यष्टीरक्षक), चामू चिभाभा, ग्रॅमी क्रेमर, नेव्हिले माडझिव्हा, हॅमिल्टन मसाकाझा, रिचमाँड मुतुम्बामी, टिनाश पानयांगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विल्यम्स.
वेळ : दुपारी १२.३० वा. पासून. थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.