सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका जिंकून २०१४ वर्षांची सुरुवात जल्लोषात केली होती. पण २०१५ वर्षांची सुरुवात याच मैदानावर करताना अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे. फिल ह्य़ूजचा धक्कादायक मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ प्रथमच या मैदानावर खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी पर्वानंतर आता भारतीय संघाला विराट कोहलीच्या रूपाने युवा कर्णधार मिळाला आहे. नव्या वर्षांत, नव्या कर्णधारासह खेळताना भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात नवी सुरुवात करावी लागणार आहे.
बॉर्डर-गावसकर चषकात भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर पडला आहे. मेलबर्न येथील तिसरी कसोटी अनिर्णीत राखत भारताने कांगारूंचा विजयरथ रोखला. पण त्यानंतर लगेचच कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती पत्करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का  दिला. या धक्क्यातून सावरणारा भारतीय संघ तसेच कर्णधारपदाचे दडपण कोहली कसा हाताळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. परदेशातील सामन्यात प्रतिस्पध्र्याचे २० बळी मिळवण्याची क्षमता नसल्यामुळे भारतीय संघाला सुमार कामगिरी करता आली. जोहान्सबर्ग, ऑकलंड, वेलिंग्टन, अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेन येथील कसोटीत विजयाच्या स्थितीत असतानाही भारताला तीन सामन्यांत पराभव आणि दोन सामन्यांत बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे प्रतिस्पध्र्याचे २० बळी मिळवण्याची क्षमता असलेले गोलंदाज निवडणे, हे कोहलीसमोरील मुख्य आव्हान असणार आहे.
कसोटी मालिका भारताने गमावली असली तरी त्यानंतर होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी तसेच लगेचच होऊ घातलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोणत्या गोलंदाजांना विश्रांती द्यायची, याचा विचार कोहलीला करावा लागणार आहे. धोनीची जागा वृद्धिमान साहा घेणार आहे, पण संघ व्यवस्थापन त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगणार नाही. वेगवान गोलंदाज वरुण आरोन संघात परतला असून भुवनेश्वर कुमारनेही सोमवारी नेटमध्ये जोमाने गोलंदाजी केली. इशांत शर्माने सरावातून विश्रांती घेतली तरी उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी यांच्यासह फिरकीपटू आर. अश्विन, कर्ण शर्मा आणि अक्षर पटेल यांनी सरावात भाग घेतला. संघनिवडीसाठी सर्व पर्याय उपलब्ध असावेत, ही कोहलीची इच्छा आहे.
सातत्याने अपयशी ठरूनही शिखर धवनला सलामीला संधी मिळतेय का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेतेश्वर पुजाराने फलंदाजीचा सराव केला नाही, यावरून त्याला या सामन्यासाठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, मुरली विजय, कोहलीसह अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल यांच्यावर फलंदाजीची भिस्त असणार आहे.
सिडनीच्या मैदानावर नोव्हेंबर महिन्यात फिल ह्य़ूजचा चेंडू लागून मृत्यू झाल्यामुळे या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलिया संघ भावनाविवश होणार आहे. या सामन्यासाठी ह्य़ूजचे कुटुंबीय हजेरी लावणार आहेत. वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या अनुपस्थितीत मिचेल स्टार्कला संधी देण्यात आली आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, वरुण आरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (राखीव).
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, जो बर्नस्, ब्रॅड हॅडिन, मिचेल स्टार्क, रयान हॅरिस, नॅथन लिऑन, जोश हेजलवूड.
सामन्याची वेळ : सकाळी पाच वाजल्यापासून.

चौथ्या कसोटीत जॉन्सनच्या जागी स्टार्कला संधी
सिडनी : वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दुखापतीमुळे भारताविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी मिचेल स्टार्कची निवड करण्यात आली आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे जॉन्सन चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही. दरम्यान, शेन वॉटसनला रविवारी पोटाच्या दुखण्याचा त्रास होऊ लागला होता. पण त्यातून तो सावरला आहे. ‘‘स्टार्कला संधी देऊन आम्ही संघात एकमेव बदल केला आहे. सिडनीतील घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. स्टार्कसारखा डावखुरा गोलंदाज संघात असणे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. जॉन्सन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. आगामी व्यस्त वेळापत्रक पाहता, त्याला खेळवण्याचा धोका आम्ही पत्करणार नाही,’’ असे स्मिथने सांगितले.

मेलबर्न कसोटी संपल्यानंतर आम्ही सामानाची आवराआवर करीत होतो. तेव्हा मला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे, असे धोनीने सांगितले. मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, असे धोनीने सांगताच सर्वच जण चकित झाले. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना धोनीचा हा निर्णय ऐकून सर्वाना धक्काच बसला. आता खडतर परिस्थितीत धोनीप्रमाणेच शांत राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे. भारतीय संघ कुठे चुकत आहे, याचे निरीक्षण मी केले असून त्या चुका टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच सामन्यादरम्यान अचूक निर्णय घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आमच्या सकारात्मक वृत्तीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आत्मविश्वासाने मैदानात उतरा, एकमेकांना पाठिंबा द्या, तसेच सकारात्मकतेने खेळून जिंकण्यासाठी प्रयत्न करा, हा आमचा मूलमंत्र असणार आहे.
    – विराट कोहली, भारताचा कर्णधार