भारताच्या पी. व्ही. सिंधूने कोरियन ओपन स्पर्धेत जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात करत विजेतेपद पटकावलं. २२-२०, ११-२१, २१-१८ अशा अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात विजय मिळवत, सिंधू कोरिया ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून सिंधूवर शुभेच्छांचा वर्षावर होतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करुन सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदलाही सिंधूने आजच्या सामन्यातून घेतला. या विजयानंतर नरेंद्र मोदींनी ट्विटर अकाऊंटवर, कोरियन ओपनमध्ये अजिंक्य ठरल्याबद्दल सिंधू तुझं मनापासून कौतुक. भारताला तुझा खूप अभिमान आहे, असा संदेश देत आपल्या शुभेच्छा दिल्या.

पहिल्या सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर चांगली लढत देत मात केली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने पुनरागमन करत सिंधूला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे तिसरा सेट हा रंगतदार होणार यात शंका नव्हती. मात्र निर्णायक सेटमध्ये सिंधूने ओकुहाराला डोकं वर काढण्याची संधीच न देता सामना जिंकत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.