पुणे : प्रत्यक्ष मैदानावर असणाऱ्या सातही खेळाडूंना चढाया व पकडी या दोन्ही शैली उत्तमरीतीने अवगत असल्या पाहिजेत, हे लक्षात घेऊनच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिले आहे, असे सायली केरिपाळेने सांगितले. तिची भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे.

राजमाता जिजाऊ संघाची खेळाडू सायलीला प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. याबाबत ती म्हणाली, ‘‘आशियाई स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. परदेशातील स्पर्धेत तिरंगा फडकविण्याचे माझे स्वप्न यामुळे साकार होणार आहे. या स्पर्धेत आम्हाला दक्षिण कोरिया, इराण आदी खेळाडूंचे आव्हान असणार आहे. तथापि त्यास सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वोच्च कौशल्य दाखवण्यावर भर देणार आहोत.’’

भारतीय संघ निवडण्यासाठी सुरुवातीला पहिल्या राष्ट्रीय शिबिराकरिता ४० खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या खेळाडूंमधून अंतिम १२ खेळाडूंची निवड झाली आहे. सायलीवर उजवा कॉर्नर सांभाळण्याची व उजव्या बाजूने चढाई करण्याची जबाबदारी आहे. त्याबाबत ती म्हणाली, ‘‘पहिल्या शिबिरात शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला होता. दुसऱ्या शिबिरात स्पर्धात्मक सरावावर भर होता. निवडण्यात आलेल्या १२ खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंची ही पहिलीच आशियाई स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्वोच्च यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे. अंतिम शिबिर लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये सकाळी व सायंकाळी किमान प्रत्येकी चार तास सराव असणार आहे. पूरक व्यायामाबरोबरच स्पर्धात्मक सरावावरही भर असेल. या स्पर्धेतही अव्वल चढाई, अव्वल पकड, आदी असे नियम असल्यामुळे त्या दृष्टीनेही नियोजन केले जाणार आहे.’’

‘‘आजपर्यंतच्या वाटचालीत माझ्या आई-वडिलांचा तसेच प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. माझे वडील संजय हे स्वत:

कबड्डीपटू असल्यामुळे या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी सतत त्यांचे प्रोत्साहन असते,’’ असेही सायलीने सांगितले.