२८ नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून, गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठणं हे संघासमोरचं पहिलं उद्दिष्ट असल्याचं संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहने म्हटलं आहे. या स्पर्धेत १६ सर्वोत्तम संघ भिडणार असून भारताचा समावेश क गटात करण्यात आला आहे. भारताला या गटात दक्षिण आफ्रिका, बेल्जिय, कॅनडा या देशांशी सामना करायचा आहे.

“साखळी फेरीतले सर्व सामने आम्हाला जिंकून पहिलं स्थान पटकावणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. विश्वचषकाची स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक संघ विजयाच्या दृष्टीकोनातून येणार आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही संघाला हलकं लेखणार नाही.” मनप्रीत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या स्पर्धांमध्ये सामना खेळला नाहीये, त्यामुळे पहिला सामना जिंकणं हे भारतासाठी महत्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने बेल्जियमला पराभवाचं पाणी पाजलं आहे. मात्र कॅनडाने भारताला हरवलं असल्यामुळे भारत या संघांविरोधात सावध खेळणंच पसंत करेल. यंदाचा विश्वचषक भारतात होत असल्यामुळे प्रत्येक चाहत्याला भारतीय संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी अशी इच्छा आहे, त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.