करोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी क्रीडाक्षेत्रातून मदतीचा ओघ सुरूच आहे. भारताच्या फुटबॉल संघातील बचावपटू हे नेहमी मैदानावर गोलरक्षणासाठी मागच्या फळीत असतात, परंतु सध्या ‘बचाव’कार्यात मात्र ते आघाडीवर आहेत. प्रीतम कोटल आणि प्रबीर दास या बचावपटूंसह मध्यरक्षक प्रणॉय हाल्डर यांनी चार लाख रुपये जमा केले असून ते पश्चिम बंगालमधील गरीब मुलांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.

‘‘आमच्या येथील फुटबॉल प्रशिक्षण केंद्रातील अनेक मुले ही हातावर पोट असणारी आहेत. सध्याच्या स्थितीत त्यांना कमाईचे साधन कोणतेच नाही. त्यांना जेवण देत आहोत. तसेच रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांनाही मदत करत आहोत. आमच्या परिसरातील अनाथांचीही काळजी घेत आहोत,’’ असे प्रणॉयने सांगितले.

‘‘करोनाच्या सध्याच्या स्थितीत सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठीही आम्ही पैसे जमवले आहेत. सध्या सर्वानी घरात राहून देवाची प्रार्थना करण्याची गरज आहे. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल,’’ असे कोटलने सांगितले. करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात होत आहे. एक भारतीय म्हणून सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रबीर दास याने सांगितले.

या तीन बचावपटूंप्रमाणेच मेहताब हुसेन, सय्यद रहिम नाबी, डेन्सन देवादास, संदीप नंदी आणि देबब्रत रॉय या पश्चिम बंगालच्या माजी फुटबॉलपटूंनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सहकार्य दिले आहे.

क्रीडाक्षेत्राकडून मदतीचा ओघ कायम

* भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत दिली. मात्र या दोघांनी मदतीचा आकडा जाहीर केला नाही.

* सहा वेळा विश्वविजेत्या बॉक्सर मेरी कोमने राज्यसभेची खासदार म्हणून मिळणारे एका महिन्याचे एक लाख रुपयांचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले आहे.

* भारताचा टेबल टेनिसपटू जी. साथियान : १.२५ लाख

* बंगाल टेनिस संघटना : एक लाख

* भारतीय सायकलिंग महासंघ : एक लाख

* भारतीय गोल्फ युनियन :  १० लाख

* भारताची युवा नेमबाज मनू भाकर : एक लाख

पगारकपातीबाबत मेसीची बार्सिलोनावर टीका

माद्रिद : बार्सिलोना फुटबॉल संघाच्या खेळाडूंच्या मानधनातून करोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी ७० टक्के कपात करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयानंतर बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसी याने संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘‘आमच्या पगारातून ७० टक्के कपात होणार आहे. त्याशिवाय आम्ही आर्थिक हातभार करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी लावत आहोतच. या स्थितीत संघाच्या कर्मचाऱ्यांना १०० टक्के पगार मिळणार आहे. मात्र दरवेळेस आम्हा खेळाडूंवर याप्रकारे पगारकपातीचे बंधन टाकणे अयोग्य आहे.