पदार्पणाच्या कसोटीत छाप पाडणाऱ्या शॉला माजी क्रिकेटपटूंचा सल्ला

वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी कारकीर्दीतील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉने सर्वानाच आपल्या फलंदाजीची भुरळ पाडली. भारतासाठी पदार्पणातच शतक झळकावत त्याने दमदार सुरुवात केली असली, तरी विदेशी दौऱ्यांवर येणाऱ्या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी त्याने आपले तंत्र अधिक विकसित करून घेतले पाहिजे, अशी भावना माजी क्रिकेटपटूंनी प्रकट केली आहे.

मार्च महिन्यात न्यूझीलंड येथे झालेल्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पृथ्वीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने १३४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

‘‘पृथ्वीचे बॅकफूटवरील फटके मला माझी आठवण करून देतात. त्याला शरीराच्या लांब असलेले चेंडू खेळण्याचीही फार सवय आहे, असे वाटते. मात्र भारतातील खेळपट्टय़ांपेक्षा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथील परिस्थिती नक्कीच वेगळी आहे. त्यामुळे बॅट व पायामध्ये अंतर सोडल्याने त्याला अपयशास सामोरे जावे लागू शकते,’’ असे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू कार्ल हूपर म्हणाले.

२००३-०४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वीरेंद्र सेहवागच्या साथीने सक्षमपणे सलामीची जबाबदारी हाताळणारा आकाश चोप्रा म्हणाला, ‘‘पृथ्वीला त्याच्या उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंना छेडण्याची सवय कमी करावी लागणार आहे. त्याचा खेळ नैसर्गिकरीत्याच आक्रमक असून  सेहवागनेसुद्धा अशाच प्रकारे खेळ करून यश मिळवले. त्यामुळे त्या शैलीनुसार पृथ्वीलाही यश मिळू शकते.’’

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला जोश हॅझलवूड, मिचेल स्टार्क यांसारख्या गोलंदाजांना सामोरे जावे लागेल. तेथे त्याला उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकून सतावले जाईल. त्यामुळे त्यापूर्वीच पृथ्वीने फलंदाजीतील त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करण्यावर भर द्यावा,’’ चोप्रा म्हणाला.

मात्र पृथ्वीला त्याच्या बालपणापासून ओळखणाऱ्या अमोल मुजुमदारने त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली व त्याला त्याच्या शैलीतच फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, ‘‘माझ्या मते त्याला त्याच्या खेळण्याच्या शैलीत किंचितही बदल करण्याची आवश्यकता नाही. हवेत फटके मारून जर त्याला यश मिळत असेल व त्याचा संघालाही लाभ होत असेल, तर पृथ्वीने फलंदाजीत कोणतीही सुधारणा करू नये. प्रत्येक फलंदाज हा तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण असतोच असे नाही. फक्त कोणत्या चेंडूवर फटका खेळावा व कोणता चेंडू छेडछाड न करता यष्टीरक्षकाकडे जाऊ द्यावा, याची निवड त्याने योग्य रीत्या केली पाहिजे.’’