विजय हजारे चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये मुंबईच्या संघाने सौराष्ट्राच्या संघाचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईकडून कर्णधार पृथ्वी शॉ याने दमदार कामगिरी करत आठ षटकं शिल्लक असतानाच विजय मिळवला. सौराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत धाव फलकावर २८४ धावा झळकावल्या. या धावसंख्येचा पाठला करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पृथ्वी शॉने यशस्वी जैस्वालच्या सोबत पहिल्या विकेटसाठी २३८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. पृथ्वीने १२३ चेंडूंमध्ये १८५ धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने २१ चौकार आणि सात षटकार लगावले. म्हणजेच १८५ पैकी ८६ धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने अवघ्या २८ चेंडूत केल्या. विजय हजारे चषक स्पर्धेतील पृथ्वीचे हे तिसरे शतक आहे.

नक्की पाहा >> Vijay Hazare Trophy: राहुल द्रविडच्या शिष्याने ठोकल्या १९२ धावा; चौकार, षटकारांचा पाडला पाऊस

प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने पाच गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकांमध्ये २८४ धावा केल्या. ५.६८ च्या गतीने पाच गड्यांच्या मोबदल्यात सौराष्ट्र संघाने उभारलेल्या या धावसंख्येमध्ये विश्वराजसिंह जडेजा आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी ५३ तर समर्थ व्यासने सर्वाधिक म्हणजेच नाबाद ९० धावांचे योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या पृथ्वी आणि यशस्वी या जोडीने सौराष्ट्रच्या गोलंदाजीची पिसं काढली. पहिल्या विकेटसाठीच २३८ धावांची भागीदरी या दोघांनी केली. यशस्वी १०४ चेंडूत ७५ धावा करुन बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान १० चौकार आणि एक षटकार लगावला. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

मात्र दुसरीकडे आयपीएलमधील वाईट कामगिरीसाठी टिकेचा धनी ठरलेल्या पृथ्वीने विजय हजारे मालिकेतील आपली कामगिरी अधिक उंचावत संघाला विजय मिळून दिला. १८५ धावांची नाबाद खेळी पृथ्वीने केली. पृथ्वीने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या मालिकेमधील पृथ्वीची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने दिल्लीविरुद्ध ८९ चेंडूत १०५ धावा, महाराष्ट्राविरुद्ध ३८ चेंडूत ३४ धावा, पुद्दुचेरीविरुद्ध १५२ चेंडूत नाबाद २२७ धावा, राजस्थानविरुद्ध ३० चेंडूत ३६ धावा, हिमाचलविरुद्ध पाच चेंडूत दोन धावा केल्या आहेत. सहा सामन्यांमध्ये १९६.३ च्या सरासरीने पृथ्वीने दोन शतके आणि एका द्विशतकाच्या मदतीने एकूण ५८९ धावा केल्यात.

काल  झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये कर्नाटकने केरळचा पराभव केला. या सामन्यातही सलामीवीर म्हणून फलंदाजीला आलेल्या देवदत पडीक्कल आणि कर्नाटकचा कर्णधार रविकुमार समर्थने दमदार कामगिरी करत संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिलं. पडीक्कलने ११९ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या तर समर्थने तब्बल १९२ धावा ठोकल्या. कर्नाटकने दिलेलं ३३८ धावांचं आव्हान केरळला पेलवलं नाही. केरळचा संघ २५८ धावांमध्ये तंबूत परतला.