मुंबईकर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या आधारावर भारत अ संघाने, लेस्टरशायर संघाविरुद्ध ४५८ धावांची मजल मारली आहे. अ श्रेणीच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. पृथ्वी शॉने आक्रमक खेळी करताना ९० चेंडुंमध्ये १३२ धावा काढल्या. तर मयांक अग्रवालने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करत १०६ चेंडूंमध्ये १५१ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी सलामीला भारतासाठी २२१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. यानंतर शुभमन गिलने फटकेबाजी करुन केलेल्या ८६ धावांमुळे भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५८ धावांपर्यंत मजल मारली.

नाणेफेकीदरम्यान भारत अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारताच्या सलामीवीरांनी सार्थ ठरवला. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर शुभमन गिलने संघाची कमान आपल्या हाती घेतली. शुभमन गिलने आदील अलीच्या गोलंदाजीवर ४ उत्तुंग षटकार खेचले. मधल्या फळीत दिपक हुडानेही २५ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.