ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होते आहे. दोन्ही डावांत सुमार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सध्या टीकेचा धनी बनला आहे. २६ डिसेंबरला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने यादरम्यान निच्चांकी धावसंख्येची नोंद केली.

अवश्य वाचा – खराब कामगिरीनंतर चहुबाजूंनी टीका होत असताना पृथ्वी शॉचा सूचक संदेश, म्हणाला…

भारतीय संघाचे माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ यांनी पृथ्वी शॉ आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड व्हायला नको होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ज्या पद्दतीने मारा करतात त्याचा सामना करण्यासाठी तो तयार नव्हता. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर वळणाऱ्या चेंडूवर खेळण्यासाठी त्याची तयारी दिसली नाही. याव्यतिरीक्त चेतेश्वर पुजारा बाद झाला तो चेंडू खरंच उत्तम होता…त्या चेंडूवर कोणीही बाद झालं असतं. परंतू इतर फलंदाजांचं फुटवर्क हे अतिशय वाईट होतं. भारतीय फलंदाज फटका खेळताना द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखे वाटत होते.” विश्वनाथ मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – फोन बंद करा, संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा ! मोहम्मद कैफचा भारतीय संघाला सल्ला

दरम्यान, पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून एक सूचक संदेश दिला आहे. तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जर इतर लोकं तुम्हाला नाउमेद करत असतील तर याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट करु शकता आणि इतर नाही…अशा आशयाचा संदेश पोस्ट करत पृथ्वीने आपले इरादे स्पष्ट केलेत.