‘‘न्यूझीलंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पृथ्वी शॉची कामगिरी मी पाहिली आणि प्रभावित झालो. त्याचा विकास हा योग्य पद्धतीने होतो आहे,’’ अशी कौतुकाची थाप सचिन तेंडुलकरने मारली. मुंबई ट्वेन्टी-२० लीगचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. त्या वेळी या लीगचा सदिच्छादूत म्हणून सचिन बोलत होता. या वेळी मुंबईच्या क्रिकेटला योगदान देणाऱ्या आजी-माजी क्रिकेटपटूंची उपस्थिती होती. तेंडुलकरने या वेळी युवा क्रिकेटपटूंना मोलाचा सल्लाही दिला. तो म्हणाला, ‘‘खेळाचा अनादर करू नका. खेळाची मूल्ये सांभाळा. आचरेकर सर आणि माझ्या भावाने हे माझ्यात रुजवले. यश मिळवण्यासाठी जवळचा मार्ग पत्करू नका.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘मी मुंबईकडून खेळायला लागलो, तेव्हा लक्षात आले की अनेक क्षमता असलेले खेळाडू मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न जोपासून खेळत आहेत. याचप्रमाणे जेव्हा भारताकडून खेळायला लागलो, तेव्हा लक्षात आले की अनेक गुणी खेळाडू देशाकडून खेळण्याइतपत सक्षम आहेत. परंतु हे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या या सर्वासाठी मुंबई ट्वेन्टी-२० लीग महत्त्वाची असणार आहे. याचप्रमाणे या संघांशी निगडित साहाय्यक मार्गदर्शकांना रोजगार मिळेल.’’

खिलाडूवृत्तीचे मोल देऊन यश मिळवू नका. या लीगमधील गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा लीग प्रशासक आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि एमसीएचे अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.

पालकांना आवाहन

‘‘वानखेडे स्टेडियमशी माझे ऋणानुबंधाचे नाते आहे. याच मैदानावर माझे विश्वचषकाचे स्वप्न साकार झाले. त्यानंतर माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना वानखेडेवरच खेळलो. माझ्या आईने हा माझा पहिला सामना २४ वर्षांनी पाहिला. त्यामुळे मी या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या पालकांनी  स्टेडियमवर या,’’ अशी विनंती  तेंडुलकरने केली आहे.