News Flash

मुंबईकर क्रिकेटर पृथ्वी शॉने ‘त्या’ चुकीसाठी स्वत: सह वडिलांना धरले जबाबदार!

BCCIने पृथ्वीवर घातली होती ८ महिन्यांची बंदी

(संग्रहित छायाचित्र)

२०१८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचे नाव क्रिकेटजगतात मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले. त्याने लवकरच भारतीय संघात स्थान मिळवले आणि वेस्ट इंडिजविरूद्ध संस्मरणीय कसोटी पदार्पण करत शतक झळकावले. पण मुंबईच्या या युवा फलंदाजाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान त्याला दुखापत झाली. त्याने खराब फॉर्मसह झुंज दिली. त्यानंतर तो डोपिंग टेस्टमध्ये सापडला, ज्यामुळे तो ८ महिने क्रिकेटपासून दूर राहिला.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना पृथ्वी शॉने आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण वेळ आणि त्यास कशा प्रकारे सामोरे गेले हे सांगितले. पृथ्वी शॉने डोपिंग टेस्टबाबतही खुलासा केला. तो म्हणाला, ”न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत सर्व काही माझ्यासाठी चांगले चालले होते. आयपीएल २०२०मध्ये मी चांगली कामगिरी करत होतो. २०१८-१९ ही मालिका अशी होती, की जिच्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. अचानक मला पायाला दुखापत झाली. तिसर्‍या कसोटीत मी फिट होण्यासाठी फिजिओ आणि टीम मॅनेजमेंटने खूप परिश्रम केले, परंतु काही काळानंतर रिकव्हरी थांबली. मला खूप वेदना होत होत्या आणि मी दु: खी होतो. अशा गोष्टी घडतात, असे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला.”

‘‘तुला विराट आणि रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील?”

तो म्हणाला, ”जेव्हा मी परत आलो, तेव्हा मी उपचार सुरू केले आणि आयपीएल खेळलो. पण त्यानंतर कफ सिरप प्रकरण घडले. मला वाटते की यासाठी मी आणि माझे बाबा जबाबदार आहेत. इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना मला खोकल्याचा आणि सर्दीचा खूप त्रास झाला होता. मी जेवायला गेलो होतो, पण मला खूप खोकला होता. हे मी वडिलांना सांगितले. त्यांनी मला सांगितले, बाजारात उपलब्ध असलेले कफ सिरप घे. मी माझ्या फिजिओशी सल्लामसलत केली नाही आणि ती माझी चूक ठरली.”

”मी दोन दिवस सिरप घेतले आणि तिसर्‍या दिवशी माझी डोप टेस्ट झाली. त्या वेळी मी बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करण्यात पॉझिटिव्ह आढळलो. माझ्यासाठी ती खूप कठीण वेळ होती, ज्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. मला माझ्या प्रतिमेची आणि लोकांना काय वाटेल याची भीती वाटत होती. मग मी या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी लंडनला गेलो. तिथेही मी माझ्या खोलीतून फारसे बाहेर पडलो नाही”, असे पृथ्वीने सांगितले.

पृथ्वी शॉने सर्व अपयश मागे ठेवत जोरदार पुनरागमन केले. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. निलंबित आयपीएलमध्ये त्याने ३००हून अधिक धावाही केल्या.

फाटलेले शूज आणि नसलेला स्पॉन्सर..! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सांगितली व्यथा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 5:26 pm

Web Title: prithvi shaw reveals secret behind eight month ban due to dope test adn 96
Next Stories
1 फाटलेले शूज आणि नसलेला स्पॉन्सर..! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सांगितली व्यथा
2 ‘‘तुला विराट आणि रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील?”
3 क्रिकेटपटूंनंतर आता फुटबॉलपटूची करोना लढ्यात उडी, गोलकीपरने केला आपल्या जर्सीचा लिलाव