वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने युवा पृथ्वी शॉला कानमंत्र दिला आहे. वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी मालिकेत पृथ्वी शॉचे पदार्पण नक्की मानले जातेय. त्यापूर्वी अजिंक्य रहाणेने पृथ्वी शॉला आपली आक्रमक फलंदाजीची शैली कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
‘पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड झाल्याचा मला आनंद आहे. पृथ्वीला मी सुरूवातीपासूनच फलंदाजी करताना पाहत आलो आहे. तो एक आक्रमक सलामीचा फलंदाज आहे. भारत अ संघाकडून खेळताना आक्रमक फलंदाजीचे त्याला यश मिळाले आहे.’ असे अजिंक्य रहाणे म्हणाला.

वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्य बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, ‘वेस्ट इंडिजला आम्ही हलक्यात घेणार नाही. वेस्ट इंडिज संघातील बऱ्याच खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे.’ पहिल्या कसोटी सामन्यात राहुलसोबत पृथ्वी शॉ किंवा मयंक यापैकी कोण सलामीला खेळणार याबात अजिंक्यला विचारले. यावर तो म्हणाला, ‘पहिल्या कसोटी साठी भारतीय संघ कसा असेल याबाबत मला फारसे माहित नाही. पण संघावर कोणताही दबाव नाही. प्रत्येक खेळाडूला आपला नैसर्गिक खेळ करण्याची संधी आहे. युवा खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. मला माहित आहे ते आपला सर्वोत्म खेळ करतील. पृथ्वी शॉ ज्याप्रकारे मुंबई आणि भारत अ संघाकडून खेळला तसाच भारतीय संघाकडून आक्रमकपणे खेळेल.’

इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर अजिंक्यने विजय हजारे चषकात बडौदा, कर्नाट आणि रेल्वेविरोधात खेळाताना मुंबईला विजय मिळवून दिला आहे. तो म्हणाला की, ‘वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेपूर्वी मला अभ्यास करण्याची संधी मिळाली. इंग्लंडवरून आल्यानंतर मुंबईसाठी सर्वोत्म कामगिरी करण्याचे माझे लक्ष्य होते जेणेकरून वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी माझी तयारी होईल.’