भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ वर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे. डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने  बीसीसीआयने त्याला आठ महिन्यांसाठी निलंबीत केले आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे.

बीसीसीआयने मंगळवारी सांगितले की, पृथ्वी शॉ ने उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. हा पदार्थ साधारणपणे खोकल्याच्या औषधांमध्ये आढळतो. त्याने या पदार्थाच सेवन केल्याने हे डोपिंग नियमांचं उल्लंघन झाले आहे. त्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे’, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

२२ फेब्रवारी २०१९ रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पृथ्वी शॉच्या यूरीन सॅम्पलमध्ये बंदी असलेल्या पदार्थाचा अंश आढळला होता.  शॉ याने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत. मात्र आपण अनावधानाने या पदार्थाचे सेवन केल्याचे त्याने सांगितले आहे.

निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्येही  पृथ्वी शॉ  ला संधी मिळू शकणार नाही.   पृथ्वी शॉसह विदर्भ संघाकडून खेळणारा अक्षय दुल्लारवार आणि राजस्थानकडून खेळणारा दिव्य गजराज यांनाही डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आले आहे.