मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉ सध्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवतो आहे. पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावलं. मात्र त्याच्या खेळीचं कौतुक करण्याऐवजी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा खेळाडू असून, त्याला आपली खरी ओळख सांगू नये म्हणून मनसेकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप बिहारचे काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं आहे. News18 लोकमत या वाहिनीने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.

अखिलेश प्रसाद सिंह हे काँग्रेसचे बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. गुजरातमध्ये बिहारी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारला असता अखिलेश प्रसाद सिंह यांनी पृथ्वी शॉ चं उदाहरण दिलं. पृथ्वी हा बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूरचा रहिवासी आहे. मात्र त्याला महाराष्ट्रात हे सांगू दिलं जात नाहीये. बिहारी असल्याचा उल्लेख केला तर खेळू देणार नाही अशी धमकी मनसेकडून पृथ्वीच्या परिवाराला दिली जात असल्याचं, अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस खासदाराने केलेल्या आरोपावर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “आम्ही कोणालाही धमकी देण्याचं कारणच नाही. कोणही उपटसुंभ आमच्याबद्दल काहीही बोलेल. जर पृथ्वी शॉला धमकी मिळाली असेल तर तो किंवा त्याचे आई-वडील यावर काहीही बोलले नसताना ते बिहारच्या खासदाराला कसं समजलं? या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पृथ्वीच्याच घरच्यांना विचारा असंही संदीप देशपांडे म्हणाले.