१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर

मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ याच्याकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

‘अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने २०१८ मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ  जाहीर केला. या संघाचे सराव शिबीर ८ ते २२ डिसेंबर या कालावधीत बेंगळूरु येथे आयोजित करण्यात आले आहे. मात्र  रणजी करंडक स्पर्धेत खेळत असल्याने शॉ आणि बंगालचा इशान पोरेल यांना काही दिवसांसाठी उपस्थित न राहण्याची मुभा देण्यात आली आहे. १२ डिसेंबरनंतर हे दोन्ही खेळाडू शिबिरात सहभागी होतील,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली.

गतउपविजेत्या भारताने २०००, २००८ आणि २०१२ मध्ये विश्वचषक उंचावला आहे. गतवर्षी बांगलादेश येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून हार पत्करावी लागली होती. विश्वचषक स्पर्धा सर्वाधिक तीन वेळा जिंकणाऱ्या संघांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (१९८८, २००२, २०१०) संयुक्तपणे अव्वल स्थानीआहेत.

भारतीय संघ

पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), मनोज कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), हार्विक देसाई (यष्टीरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशार पोरेल, अर्शदीप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव; राखीव : ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, उर्विल पटेल आणि आदित्य ठाकरे.