कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉचं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कौतुक केलं आहे. पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात पहिल्या दिवशी १३४ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी पाहून तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही चांगली कामगिरी करेल असा आत्मविश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : एक शतकी खेळी आणि ९ विक्रमांची नोंद, राजकोटमध्ये पृथ्वी शॉ चमकला

“ज्या पद्धतीने पृथ्वी शॉने पहिल्या दिवशी खेळ केला आहे, त्याचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याने विंडिजच्या गोलंदाजांवर पूरती मात केली. आपला पहिलाच सामना खेळत असतानाही सर्व गोष्टी माहिती असलेल्या एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे तो खेळत होता.” कोलकाता येथे एका खासगी मॅरेथॉनच्या उद्घाटनावेळी तो पत्रकारांशी बोलत होता. फलंदाजीदरम्यान त्याचा सकारात्मक दृष्टीकोन त्याला भविष्यकाळात फायदेशीर ठरेल. १९ वर्षाखालील संघात क्रिकेट खेळणं व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणं यात फरक आहे. त्यामुळे आगामी काळात पृथ्वीला भारताकडून खेळण्याच्या अधिक संधी मिळतील अशी आशाही सौरवने व्यक्त केली.

पृथ्वी बॅकफूटवर जाऊन चांगले फटके खेळतो. ऑस्ट्रेलियात अशाप्रकारे खेळी करणाऱ्या फलंदाजांची तुम्हाला गरज असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. आगामी काळात त्याला अनेक देशांविरुद्ध खेळायचं आहे, त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या खेळात सुधारणा होईल असंही सौरव म्हणाला. पहिल्या दिवशी केलेल्या शतकी खेळीमुळे पृथ्वी शॉची तुलना विरेंद्र सेहवागशी करण्यास सुरुवात झाली होती, मात्र पहिल्याच सामन्यात सेहवागशी तुलना करणं योग्य नसल्याचंही सौरव गांगुली म्हणाला.