श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आश्वासक कामगिरी केली. सुरुवातीच्या टप्प्यांत बहारदार खेळी करणारा दिल्लीचा संघ मधल्या टप्प्यात आपला सूर गमावून बसला होता. सलामीवीर फलंदाजांच्या कामगिरीत नसलेलं सातत्य दिल्लीला चांगलंच भोवलं. पृथ्वी शॉचं अपयश हा दिल्लीच्या दृष्टीने यंदाच्या हंगामातला सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरला. सातत्याने चुकीचे फटके खेळून प्रतिस्पर्धी संघाला विकेट बहाल करण्याचा धडाका पृथ्वीने कायम ठेवला होता.

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राच्या मते पृथ्वी शॉचा अ‍ॅटिट्युड ही त्याची सर्वात मोठी समस्या आहे. “पृथ्वी शॉने चांगली सुरुवात केली. तो चांगले फटके खेळत होता आणि धावाही काढत होता. पण त्यानंतर त्याची घसरण सुरु झाली. यातून तो सावरुच शकला नाही ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट होती. पृथ्वी शॉ तरुण आहे पण आता त्याच्याकडून सातत्याने खेळ करणं अपेक्षित आहे. एखाद्या दिवशी स्ट्राईक रेट कमी असणं समजू शकतो. पण पृथ्वीचा मी खेळेन तर असाच खेळेन नाहीतर…हा अ‍ॅटिट्युड त्याची सर्वात मोठी समस्या आहे. खराब कामगिरीमुळे संघातलं स्थान गमवावं लागल्यानंतरही त्याने आपल्या खेळात बदल केला नाही.” आकाश चोप्राने आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – IPL आयोजनातून BCCI मालामाल, कमावले तब्बल **** कोटी; आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

पृथ्वी शॉच्या अपयशामुळे दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस असे दोन पर्याय सलामीला वापरुन पाहिले. परंतू त्यांच्या कामगिरीतही सातत्य दिसलं नाही. अंतिम सामन्यात स्टॉयनिस ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात पृथ्वीने अर्धशतकी खेळी करत हंगामाची चांगली सुरुवात केली होती. परंतू यानंतर फॉर्म गमावून बसलेल्या पृथ्वीने १७.५३ च्या सरासरीने फक्त २२८ धावा केल्या.