विश्वचषक शॉटगन स्पर्धा

भारताच्या पृथ्वीराज तोंडायमान आणि कायनान चेनाय यांनी अ‍ॅकापुल्को (मॅक्सिको) येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉटगन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

पुरुषांच्या ट्रॅप प्रकारातील पात्रता फेरीचा सोमवारी पहिला दिवस होता. पृथ्वीराजच्या गटात सात नेमबाजांचा समावेश होता. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर त्याने अचूक ५० नेम साधण्यात यश मिळवले. चेनायने ४९ नेम साधले. मानवजीत संधूने ४६ नेम साधले.

१०७ स्पर्धकांचा समावेश असलेल्या या गटातील पात्रतेच्या आणखी तीन फेऱ्या मंगळवारी होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीसाठी सहा जणांची निश्चिती होणार आहे. या प्रकारात दोन जणांना टोक्यो येथे २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र होता येईल.

ट्रॅप प्रकारात महिला संघाचे आव्हान संपुष्टात

ट्रॅप प्रकारात महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. इटलीच्या माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या जेसिका रॉसीने या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावताना ऑलिम्पिकमधील स्थानसुद्धा निश्चित केले. अंतिम फेरीत ४५ नेम साधताना तिने महिलांच्या ट्रॅप प्रकारात जेतेपद मिळवले.

ऑस्ट्रेलियाच्या लॅटिशा स्कॅनलानने ४३ नेमसह रौप्यपदक मिळवले. चीनच्या डेंग वेयुनने कांस्यपदक पटकावले. लॅटिशाने आधीच ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केल्यामुळे दुसऱ्या स्थानावर डेंग पात्र ठरली.

या प्रकारात भारताच्या शगुन चौधरीने सर्वोत्तम कामगिरी केली. तिने १२५ पैकी ११६ गुण मिळवताना १९वे स्थान प्राप्त केले. राजेश्वर कुमारीने ११२ गुणांसह ३६वे आणि वर्षां वर्मनने १०५ गुणांसह ५२वे स्थान मिळवले.